काही दिवसांमध्ये आयपीएलच्या १२ व्या पर्वासाठीचा लिलाव होणार आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये सध्या आयपीएलची जोरदार चर्चा असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेमध्ये सध्या मझांसी सुपर लीग २०१९ ही स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेमधील भन्नाट खेळामुळे सध्या सोशल नेटवर्किंगवर ती चांगलीच चर्चेत आली आहे. मग ते तबरेज शम्सी सारख्या गोलंदाजाने मैदानात जादू दाखवणे असो किंवा भन्नाट श्रेत्ररक्षणाचे व्हिडिओ असो ही स्पर्धा सोशल मिडियावर चर्चेत आहे हे मात्र खरं. याच चर्चेत आता आणखीन एक भर पडली आहे ती म्हणजे दक्षिण आफ्रीकन संघाचा कर्णधार फॅफ डू प्लेसिसच्या एका वक्तव्याची.
मझांसी सुपर लीगमध्ये यंदा फॅफ डू प्लेसिस पार्ल रॉक्स संघाचे नेतृत्व करत आहे. रविवारी पार्ल रॉक्स आणि नेल्सन मंडेला बे जायंट्स या संघांमध्ये सामना झाला. या समान्याआधी नाणेफेक जिंकल्यानंतर फॅफने एक मजेदार विधान केले. फॅफच्या याच वक्तव्याचा व्हिडिओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर फॅफला संघामध्ये कोणकोणते खेळाडू आहेत असं विचारण्यात आलं. त्यावर त्याने “आज संघामध्ये काही बदल आहेत. हार्डस विल्जॉईनला आज संघात स्थान देण्यात आलेले नाही कारण तो सध्या माझ्या बहिणीबरोबर पलंगावर झोपला असेल. कालच त्या दोघांचे लग्न झालं आहे,” असं सांगितलं. त्याचं हे विधान ऐकून प्रश्न विचारणाऱ्यालाही हसू आलं.
Faf du Plessis “Hardus Viljoen is not playing today cos he is lying in bed with my sister. They got married yesterday.” This is hilarious pic.twitter.com/1AwHQnrUtC
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— Mazher Arshad (@MazherArshad) December 8, 2019
हार्डस विल्जॉईन हा फॅफची बहीण रेमी रेहिनर्सला मागील अनेक वर्षांपासून डेट करत होता. मझांसी सुपर लीगमधील एकदिवसीय सामन्याआधीच या दोघांनी शनिवारी लग्न केलं. हार्डस हा आयपीएलमधून किंग्स इलेव्हन पंजाब संघाकडून खेळला आहे. त्याने २०१६ साली आफ्रीकन संघाकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे.