ChatGPT convinces US techie to commit murder and kill himself : चॅटजीपीटीचा वापर गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. दरम्यान एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. ज्यामुळे चॅटजीपीटी हा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारावर चालणारा चॅटबॉट चर्चेत आला आहे. ओपन एआयने विकसित केलल्या चॅटजीपीटीने अमेरिकेतील एका पॅरानॉईड व्यक्तीला खून करण्यासाठी आणि नंतर स्वतःचा जीव घेण्यासाठी प्रवृ्त्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
वॉल स्ट्रीट जर्नलने दिलेल्या माहितीनुसार, Connecticut येथील याहू कंपनीतील माजी मॅनेजर स्टेन-एरिक सोएलबर्ग यांनी चॅटजीपीटी बरोबर केलेल्या संभाषणनंतर आपल्या आईची हत्या केल्याचे सांगितले जात आहे.
नेमकं काय झालं?
टेक इंडस्ट्रीमधील दीर्घकाळाचा अनुभव असलेले ५६ वर्षीय सोएलबर्ग यांना कथितपणे त्यांची आई त्यांच्यावर पाळत ठेवत असल्याची खात्री पटवून देण्यात आली होती. इतकेच नाही तर सोएलबर्ग यांनी चॅटबॉटबरोबर केलेल्या संभाषणानांनी त्यांच्या भ्रमांना उत्तेजना दिली आणि त्यांची ८३ वर्षीय आई कदाचित त्यांना psychedelic औषधातून विष देण्याचा प्रयत्न करू शकते असे सुचवले.
मानसिक आजारांची पार्श्वभूमी
रिपोर्टमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसीर, एरिक यांना मानसिक आजारांची पार्श्वभूमी होती आणि ते त्यांची आई सुझन एबरसन ॲडम्स यांच्याबरोबर राहत होते. त्यांने चॅटबॉटवर विश्वास ठेवला आणि त्यांच्या हत्येचा प्रयत्न होऊ शकतो अशा विचाराखाली ते राहत होते.
WSJ च्या रिपोर्टनुसार, चॅटबॉटने सोएलबर्ग यांच्या विचित्र विचारांना खतपाणी दिले. इतकेच नाही तर “एरिक तू वेडा नाहीस,” असंही सांगितलं. या आई-मुलाचे मृतदेह ५ ऑगस्ट रोजी त्यांच्या घरात आढळून आले होते.
चीफ मेडिकल एक्झामिनर कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, सुझन एबरसन अॅडम्स यांची हत्या झाली होती, याचे कारण म्हणजे त्यांची मान आणि डोक्यावर एका बोथट वस्तूने वार केल्याच्या खुणा होत्या. तर सोएलबर्ग यांच्या मृत्यूचे कारण हे गळा आणि छातीवर तीक्ष्ण हत्याराने केलेल्या जखमा हे होते. तसेच त्यांचा मृत्यू हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे आढळून आले होते.
सोएलबर्ग यांनी ही घटना घडण्यापूर्वी काही महिन्यांत चॅटजीपीटीबरोबरच्या त्यांच्या संभाषणाचे तासभर लांबीचे व्हिडीओ इंस्टाग्राम आणि युट्यूबवर पोस्ट केले होते. या संभाषणातून दिसून आले की एआय चॅटबॉटने सोएलबर्ग यांच्या पॅरानॉइया (Paranoia)मध्ये भर घातली आणि त्यांच्या आईला एका राक्षस असल्यासारखे दाखवले, तसेच त्यांची दिशाभूल केली.