मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने राज्यातील ‘वर्ग २’ प्रकारातील किल्ल्यांचा विकास करण्यासाठी ते किल्ले भाडेतत्वावर हॉटेल व्यवसायिकांना देण्याचा विचार सुरु केला आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून (एमटीडीसी) राज्यातील २५ किल्ल्यांची यादी तयार करण्यात आली आहे. हे किल्ले करारावर हॉटेल व्यवसायिकांना रिसॉर्ट तसंच हॉटेल उभारण्यासाठी दिले जाण्याची शक्यता असल्याचे वृत्त आठवडाभरापूर्वी समोर आले होते. त्यानंतर यावरुन बराच वाद झाला. सध्या हा वाद शांत झाला असला तरी या निर्णयाला होणारा विरोध कमी होताना दिसत नाहीय. एका दूर्गप्रेमी तरुणीने या निर्णयाचा विरोध करण्यासाठी सिंहगड किल्ल्यावरुन मुख्यमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचा कडेलोट करुन त्याचा व्हिडिओ फेसबुकवर पोस्ट केला आहे.

फेसबुकवर व्हायरल झालेला व्हिडिओ पूजा झोळे या तरुणीने आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केला आहे. मुळची करमाळ्याची असणारी पूजा ही पुण्यामध्ये शिक्षण घेत असून ती गडकिल्ले संवर्धन आणि इतर अनेक सामाजिक विषयांवर फेसबुकच्या माध्यमातून व्यक्त होते असे तिच्या टाइमलाइनवरुन दिसते. पूजाने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये तिने राज्यातील किल्ल्यांचं हेरिटेज हॉटेलमध्ये रुपांतर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचा विरोध केला आहे. “शिवाजी महाराजांनी पराक्रमाने गडकिल्ले कमावले. ज्या गडकिल्ल्यांवर आपल्या पूर्वजांनी रक्त सांडले. स्वराज्य निर्माण केलं. असे किल्ले हे फडणवीस सरकार लग्न समारंभासाठी आणि हॉटेलसाठी भाड्याने द्यायला लागले आहेत. त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार? काय कळणार आहेत त्या शनिवारवाड्याला, या रायगडाच्या आणि सिंहगडाच्या वेदना? फडणवीस साहेब तुम्हाला बायका नाचवायच्या असतील तर तुमच्या वर्षा बंगल्यावर नाचवा. तुमच्या शनिवारवाड्यावर नाचवा.” अशा शब्दांमध्ये या तरुणीने सरकारच्या निर्णयाचा निषेध केला आहे.

पुढे बोलताना या तरुणीने गडकिल्ल्यांचे महत्व सांगितले आहे. ‘आमच्या किल्ल्यांवर होतात ती फक्त युद्ध! अशी युद्ध ज्यांचा इतिहास रचला जातो आणि असा इतिहास जो आम्ही अभिमानाने सांगतो. ऐकणाऱ्याच्या अंगावरती शहारे निर्माण होतात. फडणवीस साहेब हा निर्णय तुम्ही लवकरात लवकर मागे घेतला पाहिजे आणि सर्व शिवप्रेमींची माफी मागितली पाहिजे. कारण हे गड-किल्ले म्हणजे आमची अस्मिता आहेत, आमचा इतिहास आहे. तुम्ही जो निर्णय घेतलाय त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शत्रूला आणि वाईट कृत्य करणाऱ्याला शिक्षा दिली जायची, कडेलोट केला जायचा; त्याप्रमाणे आज या सिंहगडाच्या कड्यावरून आम्ही तुमच्या या प्रतिकात्मक पुतळ्याचा कडेलोट करतेय,’ असं सांगत पूजा हातातील पुतळा खाली फेकून देताना या व्हिडिओत दिसते.

राज्य शासनाच्या या गड-किल्ले विकास धोरणासंदर्भातील वृत्त समोर आल्यानंतर फडणवीस यांचा जुना व्हिडिओ व्हायरल झाला होता. तीन वर्षांपूर्वी म्हणजेच ६ जून २०१६ रोजी शिवराज्यभिषेक सोहळ्यामध्ये फडणवीस यांनी ‘माझ्याकडून काही चूक झाल्यास माझा रायगडच्या टकमक टोकावरून कडेलोट करा,’ असे वक्तव्य केले होते त्याच वक्तव्याचा व्हिडिओ गड प्रेमींनी व्हायरल केला होता.