टायटॅनिकच्या अपघातात एका महिलेचे प्राण वाचवणाऱ्या कोटाचा गेल्याच आठवड्यात सर्वाधिक किंमतीला लिलाव करण्यात आला. टायटॅनिकशी निगडीत अनेक गोष्टींचा संग्रह उपलब्ध आहे या संग्रहांपैकी तो कोट पाहायला येणाऱ्यांची संख्या अधिक होती. या कोटाचा २,३२,००० डॉलर म्हणजे जवळपास दीड कोटींना लिलाव करण्यात आला. विशेष म्हणजे अपेक्षेपेक्षाही अधिक किंमत मोजून ब्रिटनच्या एका संग्राहकाने तो विकत घेतला आहे.

ब्रिटनच्या साऊथ हॅप्टन येथून १० एप्रिल १९१२ मध्ये न्यूयॉर्कला जाण्यासाठी टायटॅनिक जहाज निघाले होते. १४ एप्रिलला रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी उत्तर अटलांटिक महासागराच्या विशाल हिमनगावर हे जहाज आदळले. १५ एप्रिलला अवघ्या २ तास ४० मिनिटांत हजारो प्रवाशांना पोटात घेऊन या जहाजाने जलसमाधी घेतली होती. सुमारे दीड हजांराहूनही अधिक प्रवाशांचा यात मृत्यू झाला होता तर काही यातून सुदैवाने  वाचले होते. यातलीच एक होत्या माबेल बेनेट. टायटॅनिकच्या प्रथम वर्गात परिचारिका म्हणून माबेल काम करायच्या. टायटॅनिकच्या अपघातानंतर काही प्रवाश्यांना लाईफ बोटमधून सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले त्यापैकी माबेल या एक होत्या. उत्तर अटलांटिकच्या गोठवून टाकणाऱ्या थंडीपासून वाचण्यासाठी माबेल यांनी तिथेच पडलेला एक कोट उचलला होता. या कोटमधला त्यांचा एक फोटोही आहे. टायटॅनिकशी निगडीत ज्या काही छोट्या मोठ्या वस्तू आहेत त्यात या कोटाचाही समावेश आहे. १९७४ मध्ये बेनेट यांचे वयाच्या ९६ वर्षी निधन झाले.

त्यांनी यापूर्वी तो कोट आपल्या भाचीला दिला होता. १९९९ मध्ये या कोटाचा लिलाव करण्यात आला होता त्यानंतर अमेरिकेतल्या एका संग्रहालयात हा कोट प्रदर्शनासाठी ठेवण्यात आला होता. हा कोट पाहायला येणाऱ्यांची संख्या अधिक होती. शनिवारी झालेल्या लिलावात ब्रिटनच्या एका संग्राहकाने दीड कोटींहूनही अधिक रक्कम  मोजून हा कोट विकत घेतला. १५ एप्रिल १९१२ मध्ये टायटॅनिकला जलसमाधी मिळाली होती या घटनेला १०५ वर्षे पूर्ण झाली. काही दिवसांपूर्वी टायटॅनिक पुन्हा एकदा चर्चेत आली होती. आयरिश पत्रकार सेनेन मोलॉनी यांनी टायटॅनिक हिमनगावर आदळून नाहीतर आग लागल्यामुळे बुडाली असल्याचा दावा केला होता.