करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने ऑक्सिजनपासून व्हेंटिलेटर्स आणि औषधांचा तुटवडा निर्माण झाला असून रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे हाल होताना दिसत आहे. देशभरातील अनेक राज्यांमध्ये हीच परिस्थिती दिसून येत आहे. अनेकांनी यासंदर्भात सोशल नेटवर्किंगवर आफला राग व्यक्त केला आहे. सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीमधील अनेक दोषांसाठी सरकारी धोऱणे जबाबदार असल्याचं सांगत सोशल नेटवर्किंगवरुन सरकावर निशाणा साधला जात आहे. करोनाच्या काळामध्ये सुरु असणाऱ्या या आरोप प्रत्यारोपांमध्ये अभिनेते आणि फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युटचे (एफटीआयआय) माजी अध्यक्ष गजेंद्र चौहान यांनीही उडी घेतली आहे. चौहान यांनी केलेल्या एका पोस्टमध्ये ते पंतप्रधान नरेंद्र मोदींचं समर्थन करताना दिसत आहेत. मात्र ही पोस्ट केल्यानंतर त्यावरुन अनेकांनी चौहान यांच्यावर टीका केल्याचं दिसत आहे.

चौहान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख करत एक ट्विट केलं आहे. “गाय आपल्या मालकावर नाराज असली तरी ती रुसून खाटीकाच्या घरी जात नाही. त्यामुळेच आम्ही मोदींसोबतच आहोत,” असं म्हटलं आहे. चौहान यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.

चौहान यांच्या या पोस्टवरुन टोला लगावताना काँग्रेसचे नेते आचार्य प्रमोद यांनी, “गाय आपली माता असते. त्यांचं मालिक कोण असू शकतं?” असा प्रश्न विचारलाय. तर दुसरीकडे अभिनेता कमला राशिद खान म्हणजेच केआरकेने, “भाईजान मात्र तुम्ही मोंदींवर नाराज का आहात? त्यांनी असं काय चुकीचं काम केलं आहे?” असा प्रश्न विचारलाय.

जीनत नावाच्या एका युझरने, “तुम्ही मोदींसोबत आहात हा तुमचा भ्रम आहे. खरं तर मोदींना त्यांच्या पदावर प्रेम आहे आणि तुम्हाला भविष्याची चिंता आहे. तुम्ही जनतेला गाय म्हणत आहात तर खाटीक कोण आहे, हे आफण स्पष्ट करावं. लोक इथे तडफडत मरत आहेत हे तुम्हाला फार महत्वाचं वाटत नाही का? हे तुमच्या भविष्यासाठी ग्रहण ठरणार लक्षात ठेवा,” असा इशारा चौहान यांना दिलाय. शिल्पी नावाच्या एका महिला युझरने, “तुम्ही अंधभक्त आहात. तुमचे हिंदू सम्राट हिंदूंची रक्षा नाही करु शकले नाहीत,” असा टोला लगावला आहे. तर देव प्रकाश नावाच्या व्यक्तीने, “गाय मालकावर नाराज का असेल? तिला खायला मिळालं नाही का? औषधं मिळाली नाहीत का? त्याशिवाय तिचा मृत्यू झाला तर?”, असा प्रश्न विचारलाय.

चौहान यांचं हे ट्विट दोन हजार ६०० हून अधिक वेळा रिट्विट झालं आहे. तर १२ हजार जणांनी ते लाईक केलं आहे.