गजा गेला… ‘इंडिया बूक ऑफ रेकॉर्ड्स’ने नोंद घेतलेल्या सांगलीमधील बैलाचं निधन

या बैलाच्या मालकाबरोबरच त्याची आई आणि पत्नीही बैलाच्या निधनानंतर सतत रडत असल्याचं चित्र दिसत आहे, मागील साडेदहा वर्षांपासून हा बैल या कुटुंबाच्या एका सदस्याप्रमाणे होता

Gajya india biggest monster bull
कृषी प्रदर्शनांमध्येही गजाने चांगलंच नाव कमावलं. (फोटो : सॅण्डी यादव यांच्या युट्यूब व्हिडीओवरुन साभार)

महाराष्ट्रामधील मिरज तालुक्यातील कसबे डीग्रज गावामधील रहिवाशी असणाऱ्या कृष्णा साईमते यांच्या जगप्रसिद्ध गजा बैलाचं निधन झालं आहे. गजा बैलाचं वय १० वर्ष ६ महिने इतकं होतं. मागील काही दिवसांपासून गजा आजारी होता. त्याने गोठ्यामध्येच प्राण सोडला. एक टन वजन, लांबीला दहा फूट आणि उंची सहा फूट असा भारदस्त गजाला देशातील सर्वात मोठ्या आकाराचा बैल असा मान मिळाल होता. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सनेही त्याची दखल घेतली होती.

महाराष्ट्रातच नाही तर देशभरामध्ये खास करुन कर्नाटकमधील कृषी प्रदर्शनांमध्येही गजाने चांगलंच नाव कमावलं. गजा आपल्यातून गेलाय यावर साईमते कुटुंबाला अजूनही विश्वास बसत नाहीय. गजाला मालक असणारा कृष्णा तर आपल्या लाडक्या बैलाच्या आठवणीने मोठमोठ्याने रडतोय. कृष्णाच नाही तर या बैलाचा लळा लागलेले त्याचे सर्वच कुटुंबीय एखाद्या ओळखीच्या व्यक्तीचं निधन झाल्याप्रमाणे रडत आहेत. गजाची आई आणि पत्नीही डोळ्याला पदर लावून बसल्याचं पहायला मिळालं.

गजाची काळजी घ्यायची आणि त्याला कृषी प्रदर्शनांमध्ये घेऊन जायचं हेच कृष्णाचं महत्वाचं काम होतं. तो अगदी गजाच्या रोजचा खुराक ते त्याच्या तब्बेतीसंदर्भातील सगळी काळजी घ्यायचा. मात्र मागील १८ महिन्यांमध्ये करोना निर्बंधांमुळे कोणतीही कृषी प्रदर्शनं झाली नाहीत. त्यामुळे गजा आणि कृष्णा हे घरीच होते. गजाच्या माध्यमातून होणारी साईमते कुटुंबाची कमाईही यामुळे थांबली. मात्र असं असतानाही साईमते कुटुंबाने गजाला अगदी शेवटच्या श्वासापर्यंत जीवापाड प्रेम केलं. त्याला कधीच खुराक कमी पडू दिला नाही. गजाच्या जीवावर कृष्णाने एक पीकअप गाडी घेतली. गजाची ने-आण करण्यासाठी घेतलेल्या या गाडीचं कर्ज गजाच्या माध्यमातून झालेल्या कमाईमधूनच फेडलं. काही दिवसांपूर्वीच गजाचे नोंद इंडिया बूक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली होती. मात्र हा आनंद साजरा करण्याआधीच साईमते कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला. आपल्या बैलावरील प्रेमापोटी आता साईमाते कुटुंबाने गजाच्या आठवणी अनोख्या पद्धतीने जपण्याचा निर्णय घेतलाय. गजाचा सांगाडा आम्ही जपून ठेवणार असल्याचं साईमते कुटुंबिय सांगतात.

गजा अगदी लहान वासरु असल्यापासून गावामध्ये गजा आणि कृष्णाची जोडी प्रसिद्ध होती. हळूहळू गजा मोठा झाला तसं कृष्णाचं त्याची देखभाल करु लागला. मागील एका दशकाहून अधिक काळची त्यांची ही मैत्री गजाच्या जाण्याने संपली. अगदी जीवापाड प्रेम केलेल्या बैलाच्या अशा अचानक जाण्याचे कृष्णाला मोठा धक्का बसलाय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Gajya india biggest bull died in sangli scsg