नागरिकत्व संशोधन कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) विरोधी आंदोलनाचा चेहरा आणि ‘शाहीनबाग दादी’ म्हणून प्रसिद्धी मिळालेल्या बिल्किस बानो पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. अलिकडेच प्रदर्शित झालेला हॉलिवूडचा सिनेमा ‘वंडर वुमन 1984’ मध्ये प्रमुख भूमिका निभावणारी प्रसीद्ध अभिनेत्री गल गडॉट (Gal Gadot) हिने बिल्किस बानो यांना खऱ्याखुऱ्या जीवनातील आश्चर्यकारक महिला अर्थात ‘वंडर वुमन’ असं म्हटलंय.

गल गडॉट सोशल मीडियावर नेहमी अ‍ॅक्टिव्ह असते. नववर्षाच्या निमित्ताने काल तिने २०२० वर्षातील स्वतःसाठी ‘रिअल लाइफ वंडर वुमन’ असलेल्या काही महिलांचे फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केले. यामध्ये तिने ‘शाहीनबाग दादी’ अर्थात बिल्कीस बानो यांचाही फोटो शेअर केला आहे. २०२०मधील आश्चर्यकारक महिलांचे फोटो शेअर करताना, “काही माझ्या खूप जवळच्या आहेत…काही प्रेरणादायी महिला आहेत…तर काही असाधारण महिलाही आहेत ज्यांची भविष्यात भेट होईल अशी आशा आहे. आपण एकत्र आलो तर अनेक आश्चर्यकारक बाबी करू शकतो”, अशा आशयाचा मेसेज गडॉटने लिहिला आहे. गडॉटने शेअर केलेल्या वंडर वुमन लिस्टमध्ये बिल्कीस बानो यांच्याशिवाय अमेरिकेच्या नव्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस, न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न, गल गडॉटच्या कुटुंबातील महिला आणि काही मैत्रिणींचे फोटोही आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Gal Gadot (@gal_gadot)


गल गडॉटने शेअर केलेली पोस्ट नेटकऱ्यांच्या चांगलीच पसंतीस पडली असून युजर्स तिच्या पोस्टवर अनेक प्रतिक्रिया देत आहेत.