‘रागाच्या भरात कोण काय करेल, याचा नेम नाही’ अशी वाक्य अनेकदा आपल्या कानांवर पडतात. पण त्याचा ‘याची देही याची डोळा’ प्रत्यय आधी छत्तीसगडच्या गौरेला भागातल्या रहिवाशांना आणि नंतर मोठ्या संख्येनं नेटिझन्सला आला! छत्तीसगडमध्ये घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी चक्क ८० फूट उंचीच्या विचेच्या टॉवरवर चढून बसल्याचं दिसत आहे.

नेमकं घडलं काय?

हा सगळा प्रकार छत्तीसगडच्या गौरेला पेंद्रा मारवाही जिल्ह्यात घडला आहे. आपल्या प्रियकराशी फोनवर बोलत असताना या मुलीचं काही कारणावरून भांडण झालं. हे भांडण इतकं विकोपाला गेलं की त्या रागाच्या भरात ही मुलगी थेट परिसरातल्या ८० फुटांच्या विजेच्या
टॉवरवर चढून बसली. प्रकरण इतकं टोकाला जाईल याची सुतराम कल्पना नसलेल्या प्रियकराला हे पाहून धक्काच बसला. पण प्रेयसीची समजूत काढण्यासाठी मग प्रियकरही तिच्या पाठोपाठ त्या टॉवरवर चढायला लागला.

व्हायरल व्हिडीओची चर्चा!

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला. प्रियकर टॉवरवर चढत असताना काही गावकऱ्यांनी व्हिडीओ काढला आणि तो व्हायरल झाला. हे गावकरी या प्रकाराबद्दल चिंता व्यक्त करतानाही व्हिडीओत ऐकू येत आहेत.

काही वेळाने कुणीतरी पोलिसांना फोन केला. तोपर्यंत हा तरुण प्रेयसीपर्यंत, अर्थात टॉवरच्या सर्वात वरच्या टोकापर्यंत पोहोचलाही होता! पोलिसांनी मग समजावणीची भूमिका घेत या दोघांना खाली उतरवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. बराच वेळ प्रयत्न केल्यानंतर पोलिसांना या दोघांची मनधरणी करण्यात यश आलं. या दोघांविरोधात पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही. मात्र, इथून पुढे असा धोकादायक प्रकार करायचा नाही, असा सज्जड दम पोलिसांनी त्यांना दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रेयसीच्या मनधरणीसाठी तिच्यामागे तरुण ८० फुटांच्या टॉवरवर चढला खरा, पण शेवटी या दोघांना खाली उतरवण्यासाठी पोलिसांवरच त्यांची मनधरणी करण्याची वेळ आल्याचं पाहायला मिळालं!