गूगल कायमच आपल्या यूजर्सना वेगवेगळे डूडल तयार करुन एक वेगळेच सरप्राईज देत असते. आज १५ ऑगस्ट रोजी भारताचा स्वातंत्र्यदिन असल्याचे निमित्त साधत असेच एक अतिशय कल्पक असे डूडल तयार केले आहे. यामध्ये भारतीय संसद आणि राष्ट्रीय ध्वज तिरंगा यांचा वापर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे तीन रंगात असणाऱ्या या डूडलवर क्लिक केल्यावर आपल्याला गूगलवर भारतीय स्वातंत्र्य दिनाशी निगडीत सर्व बातम्या येतात.
यामध्ये पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर केलेले भाषण, विविध शहरांमध्ये शाळा,महाविद्यालयांमध्ये साजरा झालेला स्वातंत्र्यदिन, स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने असणारी प्रेक्षणिय स्थळे यांचाही समावेश आहे. याशिवाय भारताचा इतिहास, स्वातंत्र्याची चळवळ अशा सर्व गोष्टींची सविस्तर माहिती तुम्हाला सहज वाचण्यासाठी उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे गूगल एका अर्थाने आपल्या वाचकांचे ज्ञान वाढविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
या अतिशय आकर्षक अशा डूडलमध्ये रंगसंगतीही अतिशय उत्तम वापरण्यात आली आहे. यामध्ये फुले आणि मोरांची डिझाईन अतिशय कल्पक आणि सुंदर आहे. यामुळे तुम्ही काहीही सर्च करण्यासाठी गूगलवर गेलात तर तुम्हाला हे सुंदर असे डूडल दिसेल. स्वातंत्र्यदिनाचे डूडल तयार करताना कायमच वेगवेगळे प्रयोग करत असते. यावेळीही असाच प्रयोग करण्यात आला आहे. कागदी रिबिनच्या माध्यमातून हे चित्र तयार करण्यात आले असून त्याला ३ डी इफेक्ट देण्यात आला आहे.