Gemini AI Saree Trend : गुगल जेमिनीचा नॅनो बनाना ट्रेंड सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे. सर्वसामान्य युजर्सपासून अगदी अभिनेत्रींनाही या ट्रेंडची भुरळ पडली आहे. दरम्यान एका मुलीने तिचा एक अनुभव इन्स्टाग्राम व्हिडीओ पोस्ट करत सांगितला आहे. हा अनुभव ऐकल्यानंतर युजर्सही बुचकळ्यात पडले आहेत. झलक भवनानी या तरुणीने इन्स्टा व्हिडीओ पोस्ट करत प्रश्न विचारला आहे.

झलक भवनानी या तरुणीने काय म्हटलं आहे?

झलक भवनानी या तरुणीने म्हटलं आहे की, इन्स्टाग्रामवरच्या जेमिनी ट्रेंडची मलाही भुरळ पडली. मी तो ट्रेंड फॉलो करत नॅनो बनाना फिचर वापरलं आणि फोटो तयार केले. सुरुवातीला माझे फोटो पाहून मला खूपच आनंद झाला. त्यानंतर मी एक फोटो अपलोड करत त्याला रेट्रो साडी प्रॉम्प्ट केलं. त्यावेळी काही क्षणांतच काळ्या साडीतला एक सुंदर फोटो मला जेमिनीने तयार करुन दिला. तो मी सोशल मीडियावर पोस्टही केला. मात्र इथेच प्रश्न निर्माण झाला तो प्रायव्हसीचा.

माझ्या हातावरचा तीळ जेमिनीला कसा समजला?

झलक पुढे म्हणते, “मी माझा फोटो बारकाईने पाहिला आणि मला आश्चर्याचा धक्का बसला. कारण माझ्या हातावरचा तीळ जेमिनीला समजला होता. मी जो फोटो अपलोड केला त्यात हा तीळ दिसत नव्हता. पण जेमिनीने इतका बारीक तपशील अगदी बरोबर पकडला. अपलोड केलेली इमेज बघा यात कुणीही सांगू शकणार नाही की माझ्या हातावर तीळ आहे. मग जेमिनीला तीळ कसा काय कळला? कसा दिसला?” असे प्रश्न झलकने उपस्थित केले आहेत ज्यामुळे नेटकरीही चक्रावले आहेत.

सोशल मीडियावर कमेंट्सचा वर्षाव

झलकचा व्हिडीओ व्हायरल होताच अनेक नेटकऱ्यांनी यावर कमेंट करण्यास सुरुवात केली आहे. एका युजरने लिहिलं, “गुगलचं हे टूल असल्यामुळे त्याला तुमच्या गुगल अकाउंट आणि आधी अपलोड केलेल्या फोटोंमधून डेटा मिळू शकतो. त्यामुळे असे हिडन डिटेल्स ओळखले जात असावेत.” आणखी एका युजरने कमेंट केली, “माझ्याबाबतीतही असंच घडलंय. फोटो अपलोड केला तेव्हा एका छोट्या खुणा दिसत नव्हत्या, पण Gemini ने आउटपुटमध्ये दाखवल्या.” या चर्चांमुळे जेमिनीबाबत युजर्समध्ये काहीसा संभ्रम निर्माण झाल्याचं दिसून येतं आहे.

गुगलचा जेमिनीबाबतचा दावा नेमका काय?

दुसरीकडे, गुगलने यापूर्वी दिलेल्या अधिकृत निवेदनात नॅनो बनाना टूल सुरक्षित असल्याचं सांगितलं होतं. कंपनीच्या मते, हे टूल युजर्सने अपलोड केलेल्या फोटोंवरच आधारित काम करतं आणि त्यापलीकडे कोणतीही माहिती साठवत नाही. मात्र झलकच्या घटनेनंतर अनेक युजर्सना आता या दाव्याबद्दल शंका निर्माण होऊ लागली आहे.