Viral News Updates: सोशल मीडियावर दररोज अनेक वेगवेगळ्या घटनांचे व्हिडीओ किंवा फोटो व्हायरल होत असतात. या व्हिडीओद्वारे अनेक विषय चर्चेत येत असतात. आता अशाच प्रकारच्या एका घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. मात्र, त्यानंतर या घटनेबाबत सत्य समोर आल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील एका बिर्याणी रेस्टॉरंटमध्ये एक घटना घडली होती. शाकाहारी बिर्याणीमध्ये हाडाचा एक तुकडा आढळून आला होता. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला होता. पण या घटनेत मोठा ट्विस्ट आला आहे.

गोरखपूरच्या शास्त्री चौकातील एका लोकप्रिय बिर्याणी रेस्टॉरंटमध्ये शाकाहारी बिर्याणीमध्ये हाडाचा तुकडा आढळून आल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला, अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या होत्या. मात्र, या घटनेनंतर संबंधित रेस्टॉरंट मालकाने सीसीटीव्ही फुटेज जारी केल्यानंतर अखेर सत्य समोर आलं आहे. ज्या शाकाहारी बिर्याणीच्या थाळीत हाडाचा तुकडा सापडल्याचा दावा करण्यात आला होता, तो दावा चुकीचा असून त्या थाळीत हाडाचा तुकडा जाणीवपूर्व ठेवण्यात आला होता अशी माहिती समोर आली आहे. या संदर्भातील वृत्त फ्रि प्रेस जर्नलने दिलं आहे.

नेमकं काय माहिती समोर आली?

झालं असं की ३१ जुलै रोजी रात्री १२ ते १३ जणांचा एक ग्रुप जेवणासाठी रेस्टॉरंटमध्ये आला होता. रेस्टॉरंट कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, यातील काही सदस्यांनी शाकाहारी जेवण मागवलं तर काहींनी मांसाहारी. त्यानंतर त्यांना त्यांच्या ऑर्डरप्रमाणे जेवण देण्यातही आलं. मात्र, अचानक एका व्यक्तीने ओरडत शाकाहारी थाळीमध्ये हाड आढळून आल्याचा दावा केला. त्यामुळे गोंधळ झाला. त्यातच श्रावण महिना सुरू असल्यामुळे अनेकांनी धार्मिक भावना दुखावल्याचाही आरोप केला. त्यामुळे या ठिकाणी मोठा गोंधळ निर्माण झाला. त्यानंतर रेस्टॉरंटच्या मालकांनी हस्तक्षेप करून ग्राहकांना शांत करण्याचा प्रयत्न केला.

पण तरी गोंधळ वाढल्यामुळे त्या ठिकाणी पोलिसांना बोलवण्यात आलं. त्यानंतर रेस्टॉरंटच्या मालकांनी पोलिसांना सांगितलं की व्हेज आणि नॉन-व्हेज पदार्थ वेगवेगळे बनवले जातात. त्यामुळे एकाच व्यक्तीच्या थाळीत हाडाचा तुकडा कसा सापडला? हा प्रश्न आहे. तसेच रेस्टॉरंटच्या मालकांने आरोप केला की या तरुणांनी जेवणाचं बिल न भरण्यासाठी अशा प्रकारचा आरोप केला आहे. दरम्यान, त्या दिवशी सर्व घटना शांत करण्यात आली.

त्यानंतर काही दिवसांनंतर रेस्टॉरंटच्या मालकांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता एका तरुण मांसाहारी थाळीमधून दुसऱ्याच्या शाकाहारी थाळीत हाडाचा तुकडा ठेवताना दिसत असल्याचा दावा रेस्टॉरंटच्या मालकांनी केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना रेस्टॉरंटच्या मालकांनी म्हटलं की, “आमची प्रतिष्ठा खराब करण्यासाठी हे मुद्दामहून करण्यात आलं आहे. आम्ही हे रेस्टॉरंट वर्षानुवर्षे चालवत आहोत आणि आमच्या ग्राहकांच्या धार्मिक भावनांचा नेहमीच आदर केला आहे. अशा प्रकारची चुकीची माहिती केवळ आमच्या व्यवसायावरच नाही तर सांप्रदायिक सलोख्यावरही परिणाम करते”, असं त्यांनी म्हटलं आहे.