मुंबईसारख्या महानगरांमध्ये राहणाऱ्या लोकांना प्रवास करताना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागते. ऑफिसला वेळेत पोहोचण्यासाठी अनेकांना गर्दीचा सामना करावा लागतो. बस आणि ट्रेनमध्ये गर्दी असल्यामुळे खासगी वाहनांचा वापर करायचे ठरवले तर रस्त्यांवर वाहतूक कोंडी होते. त्यामुळे मध्यंतरी दिल्लीत सम-विषम वाहनांचा प्रयोग झाला. या प्रयोगामुळे एकाच गाडीतून जास्तीत जास्त जणांनी प्रवास करण्याची सवय लोकांना लागली. मात्र रशियात तब्बल एका कारमधून तब्बल १७ जण प्रवास करत असल्याचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
सोशल मिडीयावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ रशियातील यूराल भागातील आहे. या व्हिडीओत एक कार चालताना दिसत आहे. फारफार पाच प्रौढ व्यक्ती वाहून नेऊ शकणारी ही गाडी एका जागी थांबते आणि या गाडीचा चालक दरवाजा उघडून बाहेर येतो. यानंतर याच दरवाज्यातून आणखी तीन जण बाहेर येतात. अशाप्रकारे या एकाच दरवाज्यातून एकूण चार जण बाहेर पडतात. विशेष म्हणजे यातील कोणाच्याही चेहऱ्यावर प्रवासाचा कोणताही ताण नाही. हे सर्वच जण अगदी हसत हसत गाडीतून बाहेर येतात.
व्हिडीओ चित्रीत करणाऱ्या व्यक्तीने कारमधून बाहेर पडणाऱ्या लोकांची संख्यादेखील मोजली आहे. यानंतर पुढे असणाऱ्या दुसरा दरवाजा उघडून आणखी काहीजण गाडीतून बाहेर येतात. यानंतर गाडीचे मागील दरवाजे उघडतात आणि आणखी काही मजूर गाडीतून बाहेर पडतात. या मजुरांची संख्या १४ इतकी असते. मात्र यानंतर गाडीची डिकी उघडली जाते आणि त्यातून आणखी तीन जण बाहेर येतात. विशेष म्हणजे यातील एक जण हातात एक वाद्य घेऊन बाहेर येतो. या लहानश्या गाडीतून तब्बल १७ लोकांनी कसा काय प्रवास केला असेल, असा प्रश्न हा व्हिडीओ पाहणाऱ्या प्रत्येकाला पडतो आहे.
दीड मिनिटांचा हा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच चर्चेत आहे. एका गाडीतून अनेकांनी प्रवास करावा, त्यामुळे पैशांची बचत होते आणि प्रदूषणही कमी होते. अनेकदा सरकारकडून यासाठी आवाहनदेखील केले जाते. मात्र रशियातील मजुरांनी या आवाहनाला खूपच गांभीर्याने घेतल्याचे दिसते आहे. एकाच कारमधून अनेकांनी प्रवास करावा, या आवाहनला या सगळ्यांनीच एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे.