गुजरात निवडणूकीचा प्रचार जोरदार सुरु असताना त्यात अनेक मजेशीर प्रसंग पहायला मिळत आहेत. गुजरात हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बालेकिल्ला असल्याने आता तेही या प्रचाराच्या रणधुमाळीत उतरले आहेत. प्रचार रणधुमाळीत व्यग्र असलेल्या मोदींनी एका सभेत आपल्यासारखा वेश केलेल्या एका लहानग्याला पाहिले आणि ते भलतेच खूश झाले. गुजरातमधील नवसारी भागात मोदींचा दौरा सुरु होता. यावेळी निवेदक पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल माहिती सांगत असताना मोदींच्या वेशातील एक लहान मुलगा व्यासपीठावर दाखल झाला. या लहानग्याला पाहून मोदींबरोबरच उपस्थित असलेल्या सगळ्यांनाच आश्चर्य वाटले.
https://twitter.com/narendramodi/status/935883013925171205
पंतप्रधान मोदींचा वेश धारण करत त्याने त्यांच्यासारख्या चेहऱ्याचा मास्कही घातला होता. विशेष म्हणजे मोदींप्रमाणे त्याने आपल्या हातात काळा धागाही बांधला होता. हे काय आहे असे मोदिंनी त्याला विचारले तेव्हा तुम्ही घातलंय तसंच मीही घातलंय असं हा लहानगा मोंदीना म्हणाला. ‘वाह क्या बात है’ असा आपल्या हातानीच इशारा करत पंतप्रधान मोदींनी या चिमुरड्याशी हात मिळवला. इतकेच नाही तर या लहानग्याला जवळ बोलावून त्याच्याशी गप्पाही मारल्या.
आपण ज्याप्रमाणे नागरीकांना अभिवादन करतो तसेच अभिवादन करावे असे मोदींनी या चिमुकल्याला सांगितले. विशेष म्हणजे त्यानेही ते करत उपस्थितांची वाहवा मिळवली. मोदींच्या ट्विटर अकाऊंटवर याबाबतचा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून मोदी यामध्ये लहानग्याशी अतिशय कौतुकाने बोलत असताना दिसत आहेत.