खिचडी हा सगळ्यांचा आवडीचा पदार्थ. पोट भरणारी पौष्टिक खिचडी झटपट तयार होते म्हणून एखादा दिवस जेवण करण्याचा कंटाळा आला की गृहिणींची पहिली पसंती असते ती खिचडीला. पोटभर आणि पचायला तुलनेनं हलकी असलेल्या खिचडीला ‘राष्ट्रीय भोजना’चा दर्जा मिळणार अशी ‘अफवांची खिचडी’ सोशल मीडियावर शिजत होती, पण आता खिचडीला राष्ट्रीय भोजनाचा दर्जा देण्यात आलेला नसल्याचे खाद्य प्रकिया मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी स्पष्ट केलं आहे.

चिमुकलीच्या ऑनलाइन खरेदीचं बिल पाहून आईला बसला जबरदस्त धक्का

‘राष्ट्रीय भोजनावरून अफवांची खूप खिचडी शिजली, हा पदार्थ फक्त वर्ल्ड फूड इंडियामध्ये सादर करण्यात येणार आहे’ असं ट्विट हरसिमरत कौर बादल यांनी केलं आहे. ३ नोव्हेंबर पासून दिल्लीत खाद्य दिन साजरा होणार आहे. देशातल्या विविध खाद्यसंस्कृतीचा आस्वाद यावेळी जगभरातून आलेल्या पर्यटकांना चाखता येणार आहे. श्रीमंत असो वा गरीब खिचडी ही सर्वांची आवडीची आहे आणि दोन्ही वर्गात ती तयार होते, म्हणूनच खाद्य दिनी खिचडी ‘ब्रँड इंडिया फूड’ म्हणून सादर केली जाणार आहे.

या दिवशी सुप्रसिद्ध शेफ संजीव कपूर आणि त्यांची टीम खिचडी तयार करून विश्व विक्रमदेखील साधणार आहे. यावेळी १ हजार लिटरची क्षमता असलेल्या मोठ्या कढईत ८०० किलो खिचडी शिजवण्यात येणार आहे, याची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होण्याची शक्यता आहे. ‘ब्रँड इंडिया फूड’ म्हणून खिचडी या पदार्थाला आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगळा दर्जा मिळवून देण्याचा प्रयत्न असणार आहे.