सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी कोण काय करेल? याचा नेम नाही. हल्ली पदार्थांसोबत नवनवे प्रयोग करून नवं काय तरी तयार करण्याचा अट्टहास दिसतो. गेल्या काही वर्षात अनेक नवे पदार्थ नेटकऱ्यांना पाहायला मिळत आहेत. मात्र या पदार्थांची चव कशी आहे? याबाबत ज्याचं त्याला माहिती असेल. पण रोज नव्या पदार्थ्यांच्या डिश नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. कधी तोंडाला पाणी सुटतं, तर कधी केलेले प्रयोग पाहून संताप होतो. कधी कधी पदार्थांसोबतचे नवे प्रयोग यशस्वी होतात. तर कधी पदरी निराशा पडते. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर प्रत्येकाचं आवडतं पेय असलेल्या चहावर अनेक प्रयोग केले जात आहेत. यात रूह अफजा चहा पाहून यूजर्स चांगलेच संतापले होते. आता चहासोबत पुन्हा एकदा अनोखा प्रयोग पाहायला मिळत आहे. व्हायरल होत असलेल्या क्लिपमध्ये एक विक्रेता फळांचा चहा बनवत असल्याचं दिसत. गुजरातच्या सुरतमध्ये विक्रेत फ्रूट टी बनवून विकतो.

आपण सर्वजण आपला आवडता चहा बनवण्यासाठी चहा पावडरसोबत वेलची, लवंग आणि आले घालतो. व्हायरल होत असलेल्या क्लिपमध्ये दुकानदार चहामध्ये केळी, सफरचंद आणि चिकू घालून विचित्र पद्धतीने चहा बनवताना दिसत आहे. गेल्या बारा वर्षांपासून येथे फळांचा चहा विकत असल्याचा विक्रेता सांगत आहे. चहा बनवण्यासाठी सर्वप्रथम दूध एका तापेल्यात घेऊन तापवलं जातं. त्यानंतर त्यात केळं, चिकू किंवा सफरचंदाच्या फोडी टाकल्या जातात. तसेच चहा पावडर टाकली जाते. सोबतच चवीनुसार साखर टाकून चहा तयार केला जातो. शेवटी गाळणीतून व्यवस्थितरित्या गाळून चहा दिला जातो.

यूट्यूबवर हा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. विचित्र चहाची पद्धत पाहून नेटकरी आश्चर्यचकीत झाले आहेत. चहावर अत्याचार करू नका असं काही जणांचं म्हणणं आहे. तर काही जणांनी हा चहा प्यायला आवडेल असं सांगितलं आहे.