महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा हे नेटकऱ्यांमध्ये तुफान लोकप्रिय आहेत. जगभरातील वेगवेगळ्या गोष्टींवर सातत्याने ट्विटरवरुन व्यक्त होणारे आनंद महिंद्रा हे सोशल नेटवर्किंगवरील आघाडीच्या नावांपैकी एक आहे. अनेकदा आनंद महिंद्रा वेगवेगळ्या व्यक्तींच्या कामाचं कौतुक करताना, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी थेट ट्विटवरुनच खास ऑफर्स किंवा भेटवस्तू देण्याच्या घोषणा करताना दिसतात. अशीच एक घोषणा आनंद महिंद्रा यांनी महाराष्ट्रामधील सांगलीमधील एका व्यक्तीला दिलीय. थ्री इडियट्स चित्रपटामध्ये आमीर खानने साकारलेलं रँचो नावचं पात्र ज्याप्रमाणे जुगाड करुन व्हॅक्युम क्लिनर बनवतं तशीच गरज म्हणून सांगलीमधील एका व्यक्तीने जुगाड करुन चक्क एक मिनी जीप तयार केलीय. ही जीप आनंद महिंद्रांना एवढी आवडलीय की त्यांनी ही जीपच या व्यक्तीकडून मागताना एक खास ऑफर दिलीय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आधी शेअर केला व्हिडीओ…
आपल्यापैकी अनेकांनी दुचाकीला किक स्टार्ट करताना पाहिलं असेल, पण जीप किक स्टार्ट करतानाचा एक अनोखा व्हिडीओ काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. हाच व्हिडीओ आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर करत त्यावर प्रतिक्रिया दिली. ‘हे स्पष्टपणे कोणत्याही नियमांशी जुळत नाही, परंतु आपल्या लोकांच्या साध्या स्वभावाचे आणि ‘किमान’ क्षमतेचे कौतुक करणे मी कधीही थांबवणार नाही. गतिशीलतेची त्याची आवड आश्चर्यकारक आहे,’ अशा कॅप्शनहीत आनंद महिंद्रांनी हा व्हिडीओ शेअर केलेला.

गाडी बनवणारी व्यक्ती कोण?
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ही गाडी बनवणारी व्यक्ती महाराष्ट्रामधील सांगली येथील असल्याची माहिती समोर आली. अल्पशिक्षित दत्तात्रय लोहार यांनी दुचाकीचे इंजिन, चारचाकी गाडीचं बोनेट आणि रिक्षाच्या चाकांचा वापर करुन ६० हजारांमध्ये ही भन्नाट किक स्टार्ट जिप तयार केलीय. स्वत:चं फॅब्रिकेशनचं वर्कशॉप असणाऱ्या दत्तात्रय यांनी जुगाड करुन तयार केलेली ही जिप ४० ते ४५ किलोमीटर प्रवास एक लिटर पेट्रोलमध्ये करते. सध्या त्यांच्याकडे अनेकांनी अशाप्रकारची जीप बनवून देण्याची ऑर्डर दिल्याचं बीबीसी मराठीशी बोलताना त्यांनी सांगितलं. आनंद महिंद्रांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दत्तात्रय यांच्या कारनाम्याची चर्चा देशभरात होताना दिसतेय.

नक्की वाचा >> आनंद महिंद्रा म्हणतात, “जगभरात पसरलेल्या या साथीची उत्पत्ती भारतात झाल्याचा आम्हाला अभिमान, यावर कोणतीही…”

आनंद महिंद्रांनी दिली ही ऑफर…
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आनंद महिंद्रांनी दत्तात्रय यांना ट्विटरवरुन एक ऑफर दिलीय. “स्थानिक प्रशासनाकडून आज नाही तर उद्या या गाडीवर बंदी आणली जाईल कारण ती नियमांमध्ये बसत नाही. त्यामुळेच मी स्वत: त्यांना या गाडीच्या मोबदल्यान बोलेरो देण्याची ऑफर देतोय. त्यांनी निर्माण केलेली ही गाडी महिंद्रा रिसर्च व्हॅलीमध्ये आम्हाला प्रेरणा देण्यासाठी संग्राह्य ठेवली जाईल. या गाडीच्या माध्यमातून आम्हाला रिसोर्सनेसची शिकवण मिळेल,” असं आनंद महिंद्रा म्हणालेत. उपलब्ध गोष्टींमधून अधिक गोष्टी निर्माण करण्याचा धडा आम्हाला ही गाडी पाहून मिळेल असं आनंद महिंद्रा म्हणालेत.

आज भेट देणार कंपनीची टीम…
दरम्यान, आनंद महिंद्रांनी दिलेल्या या ऑफरसाठी दत्तात्रय यांनी त्यांचे आभार मानलेत. तसेच आजच म्हणजेच गुरुवारी, २३ डिसेंबर २०२१ रोजी महिंद्रा कंपनीची एक टीम लोहार यांच्या घराला भेट देऊन या गाडीची पहाणी करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Here is why anand mahindra wants to gift a bolero to a blacksmith from sangali scsg
First published on: 23-12-2021 at 08:31 IST