चार, पाच दिवसांपासून ढगाळ हवामानात राहिलेल्या राज्यातील अनेक भागांना गुरुवारी दुपारी अवकाळी पावसाने झोडपले. अनेक ठिकाणी पावसाने एक ते दीड तास जोरदार हजेरी लावली. थंडीच्या हंगामात अकस्मात झालेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. काही ठिकाणी सखल भागात, रस्त्यांवर तसेच चौकांमध्ये पाणी साचले. तर संपूर्ण राज्यातच मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण पहायला मिळत आहे. कमी दाबाचे क्षेत्र आणि वाऱ्यांच्या चक्रीय स्थितीमुळे गुलाबी थंडीच्या दिवसांमध्ये महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागांत हवामानाची विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. थंडीच्या वाटेत विघ्नांची मालिकाच उभी ठाकल्याने ती पूर्णपणे गायब होऊन राज्यात ‘हिवाळी पावसाळा’ अवतरला आहे. मुंबईसह कोकण विभागात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही अनेक ठिकाणी सोमवारी पावसाच्या सरी कोसळल्या. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील पावसाळी स्थिती ८ जानेवारीपर्यंत कायम राहणार असून, यादरम्यान राज्यात सर्वच विभागांत पावसाची शक्यता आहे. याच पावसाळी वातावरणामुळे राज्यात अनेक ठिकाणी दोन दिवसांपासून सुर्याचं नेहमीप्रमाणे दर्शन होऊ शकलेलं नाही. मात्र या मुद्द्यावरुन काँग्रेसच्या एका नेत्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत सुर्य विकला की काय असा टोला लगावला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

युवा काँग्रेसचे महाराष्ट्रामधील अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी मोदी है तो मुमकिन है म्हणत सूर्य दिसला नसल्याचा संदर्भ देत ट्विटरवरुन खोचक शब्दांमध्ये मोदींना टोला लगावला आहे. “दोन दिवसांपासून सूर्य दिसला नाही…
विकला तर नसेल ना…”, असं ट्विट सत्यजित तांबे यांनी केलं आहे.

तांबे यांच्या या ट्विटवर नेटकरी संमिश्र प्रतिक्रिया देत असून ट्विटखालील रिप्लायमध्ये भाजपा समर्थक आणि काँग्रेस समर्थक एकमेकांना कोपरखळ्या मारताना, टीका करताना दिसत आहेत.

हवामानात बदल का?

गेल्या आठवडय़ामध्ये उत्तर भारतातील बहुतांश राज्यांमध्ये थंडीची लाट होती. दिल्ली, पंजाब, हरियाणा आदी राज्यांत अनेक वर्षांतील नीचांकी तापामानाची नोंद झाली होती. या काळात महाराष्ट्रातील किमान तापमानात काही प्रमाणात घट झाली होती. मात्र, पूर्वेकडून बाष्पयुक्त वारे वाहत असल्याने थंडीचा कडाका वाढू शकला नाही. थंडीच्या मार्गातील हे विघ्न कायम असतानाच हिमालयातील पश्चिमी चक्रवात आणि राजस्थानपासून निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे उत्तरेकडील राज्यातील थंडीची लाट निवळली आणि तेथे पावसाळी स्थिती निर्माण झाली. त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरणातही झपाटय़ाने बदल झाले. तापमानात वाढ होऊन थंडी पूर्णपणे गायब झाली.

पारा घसरला

राज्यात बहुतांश भागांत ढगाळ वातावरण निर्माण झाले. सोमवारी मुंबई परिसरासह कोकणात विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावली. गुरुवारीही मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात सांगली, सातारा, कोल्हापूर, मराठवाडय़ात औरंगाबाद, जालना, विदर्भात अकोला आणि नागपूर भागांत पावसाच्या सरी कोसळल्या. मध्य महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी रात्रीच्या किमान तापमानाचा पारा १७ ते २० अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. सरासरीपेक्षा हे तापमान तब्बल ६ ते ८ अंशांनी अधिक असल्याने आणि रात्री ढगाळ स्थिती निर्माण झाल्याने काही प्रमाणात उकाडा जाणवत आहे. कोकण विभागातही मुंबईसह सर्वच ठिकाणी किमान तापमान सरासरीपुढे जाऊन २० ते २१ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. मराठवाडा आणि विदर्भातही किमान तापमान ३ ते ६ अंशांनी सरासरीपुढे गेले आहे.

किती दिवस राहणार?

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, ८ ते ९ जानेवारीपर्यंत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याचा इशाराही देण्यात आला आहे. ७ जानेवारी रोजी कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला त्याप्रमाणे अनेक ठिकाणी पाऊस झाला. ८ जानेवारीलाही राज्यात काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hope modi have not sold the sun tweets congress leader scsg
First published on: 08-01-2021 at 14:50 IST