गेल्या काही वर्षांमध्ये विमान अपघातांमध्ये वाढ झाली आहे. मध्यंतरी अपघातग्रस्त झालेल्या काही विमानांच्या शोधांसाठी कित्येक दिवस प्रयत्न करावे लागले होते. याशिवाय विमानतळावरदेखील अनेक लहान-मोठे अपघात होत असतात. वैमानिकाची एक छोटीशी चूक अनेकांसाठी जीवघेणी ठरु शकते आणि वैमानिकाने दाखवलेले प्रसंगावधान अनेकांना मृत्यूच्या दाढेतून बाहेरदेखील आणू शकते. बर्मिंगहॅममध्ये विमानतळावर असाच एक प्रसंग घडला आहे. हृदयाचे ठोके चुकवणारा या प्रसंगाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एअरबस A321 हे विमान बर्मिंगहॅम विमानतळावर उतरताना दिसत आहे. मात्र वारा अतिशय जोरात वाहत असल्यामुळे संपूर्ण विमान तिरके होते. त्यामुळे धावपट्टीवर विमान उतरवताना अडचण येते. विमान धावपट्टीच्या अगदी जवळ आल्यावरही वाऱ्याच्या वेगामुळे ते तिरकेच असल्याने त्यावेळी वैमानिक विमान न उतरवण्याचा निर्णय घेतो.
सोसाट्याचा वारा वाहत असल्यामुळे विमान तिरके होत असल्याने विमानातील प्रवाशांच्या ह्रदयाचे ठोके वाढतात. पुढे काय होणार, या काळजीने अनेकांना घाम फुटतो. वैमानिक आकाशात भरारी घेत पुन्हा एकदा विमान उतरवण्याचा प्रयत्न करतो. वाऱ्याच्या वेगाचा अंदाज घेत वैमानिक विमान धावपट्टीवर आणतो. वाऱ्याच्या वेगामुळे पुन्हा एकदा विमान तिरके होते. मात्र वैमानिक विमान शक्य तितके नियंत्रणात ठेवतो आणि विमानाची चाके धावपट्टीला लागताच विमानाला योग्य दिशा देतो. वैमानिकाने दाखवलेल्या या प्रसंगावधानामुळे एक मोठी दुर्घटना टळली आहे.
१ ऑक्टोबरला flugsnug या युट्यूब चॅनेलने हा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. आतापर्यंत १४ लाखांपेक्षाही अधिक जणांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. विमान धावपट्टीवर उतरताना वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जसे विमानातील प्रवाशांचे प्राण कंठाशी आले तशीच काहीशी स्थिती हा व्हिडीओ पाहताना अनेकांची होत आहे. वैमानिकाने प्रतिकूल स्थितीत दाखवलेली सतर्कता किती महत्त्वाची असते, हे या व्हिडीओमधून दिसून आले आहे.