नोटाबंदीच्या निर्णयामुळे लग्नघराचे हाल झाले आहेत. अनेकांना लग्नाचा खर्च करण्यासाठी पैसे अपूरे पडत आहे. त्यामुळे, कित्येकांनी आपल्या लग्नाची तारिख पुढे ढकलली आहे. पण या सगळ्यावर उपाय शोधत कर्नाटकमधल्या विजयवाडा येथील आयएएस जोडप्याने फक्त ५०० रुपयांमध्ये आपला विवाह सोहळा ओटोपला आहे.
अनिष विशिष्ठ हे आयएएस ऑफिसर असून त्यांचा सलोनी सैधाना हिच्याशी २८ नोव्हेंबरला विवाह झाला. नोटाबंदीच्या निर्णयानंतर त्यांना लग्नावर फार उधळपट्टी करणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी कोर्टात जाऊन लग्न केले. यासाठी कोर्टाची फक्त पाचशे रुपये फी भरून त्यांनी आपला विवाह सोहळा पार पाडला. त्यांच्याजवळचे काही नातेवाईक या विवाह सोहळ्याला उपस्थित होते. इतकेच नाही तर विवाह सोहळा झाल्यानंतर ते दोन दिवसांत आपल्या कार्यालयात दाखल देखील झालेत. त्यांच्या या विवाह सोहळ्याची चर्चा सोशल मीडियावर आहे.
वाचा : परिक्षेसाठी तिने लग्नाचा मुहूर्तही लांबवला
पण दुसरीकडे मात्र नोटाबंदीच्या निर्णयामुळे आणखी एका जोडप्याला ५०० रुपयांत आपला विवाह सोहळा पार पाडवा लागला होता. गुजरातमधल्या सुरत येथे राहणा-या दक्षा आणि भरत परमार यांचा विवाह सोहळा दोन दिवसांपूर्वीच पार पडला. त्यांच्या लग्नाची तारिख काही महिन्यांपूर्वीच ठरली होती. मात्र नोटाबंदीच्या निर्णयामुळे त्यांना मोठा विवाह सोहळा करता आला नाही. बँकेतून पैसे काढण्यावर मर्यादा होती. तसेच अनेक बँकांमध्ये पुरेशी रोकड उपलब्ध नव्हती त्यामुळे त्यांनी गाजावाज न करता अत्यंत साध्या पद्धतीने आपला विवाह सोहळा साजरा केला. आपल्या मोजक्याच पाहुण्यांना बोलवत फक्त चहा आणि पाण्याचे वाटप करत त्यांचा विवाह सोहळा पार पडला. लग्न सराईचे दिवस आहे, त्यामुळे लग्न घराला येणारी पैशांची अडचण लक्षात घेता सरकारने लग्नघराला बँकेतून अडीच लाख रुपयांपर्यंतची रक्कम काढण्याची सवलत दिली होती. पण तरीही ही रक्कम कमी असल्याने अनेकांनी आपल्या विवाह सोहळ्याची तारिख पुढे ढकलली होती.