व्हॉट्सअॅप या मेसेजिंग अॅपला मोठा प्रतिसाद भारतात लाभला आहे, व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांची सर्वाधिक संख्या भारतात आहे. आता व्हॉट्सअॅपवर सर्वाधिक व्हिडिओ कॉल करण्यामध्ये देखील भारतीय आघाडीवर आहेत. गेल्याचवर्षी नोव्हेंबर महिन्यात व्हॉट्सअॅपने व्हिडिओ कॉलिंगचे फिचर आणले. याला खूप चांगला प्रतिसाद लाभला. नुकतीच व्हॉट्सअॅपने यासंदर्भातील एक आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार जगभरात भारतीय युजर्स सर्वाधिक व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलचा वापर करतात असे म्हटले आहे.

विशेष म्हणजे व्हॉट्सअॅपने हे फिचर आपल्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा सगळ्यात उशीरा आणले तरीही या फिचरला खूप चांगला प्रतिसाद युजर्सकडून लाभला आहे. दरदिवशी भारतीय व्हिडिओ कॉल या पर्यायाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. दरदिवसाचा हा आकडा मिनिटांत मोजायचा झालाच, तर पाच कोटी मिनिटांचा व्हिडिओ कॉल भारतीय करतात.
व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांची जगभरात संख्या ही अब्जावधींच्या आसपास आहे. फक्त भारताचेच घ्यायचे झाले तर ही संख्या २० कोटींच्याही वर आहे. नोव्हेंबर महिन्यात व्हॉट्सअॅपने व्हिडिओ कॉलिंगचे नवे फिचर आणले होते. आजही भारतात २ जी वापरले जाते. तेव्हा व्हिडिओ कॉलिंगची सेवा या नेटवर्कवरही सुरू राहिल या दृष्टीने हे फिचर तयार करण्यात आले होते.