Phuket Tiger Attack Video Viral: थायलंडच्या फुकेत येथे अनेक पर्यटक टायगर किंग्डमला भेट देत असतात. याठिकाणी वाघाला प्रत्यक्ष समोरासमोर पाहता येतं. वाघाला हात लावता येतो आणि फोटोही काढता येतो. मात्र नुकताच एक व्हिडीओ समोर आला असून ज्यामध्ये एका भारतीय व्यक्तीवर वाघाने हल्ला केल्याचे समोर आले आहे. हा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्या व्यक्तीच्या अंगावर वाघाने हल्ला केला, त्याच्या किंकाळ्या ऐकून थरकाप उडेल.
एक्सवर सिद्धार्थ शुक्ला नामक व्यक्तीने सदर घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे. सदर व्हिडीओ व्हायरल झाला असून सिद्धार्थ शुक्ला यांच्या अकाऊंवर शेअर केलेल्या या व्हिडीओला दोन मिलियन्स व्ह्यूज मिळाले आहेत.
व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले, थायलंडमध्ये एका भारतीय पर्यटकावर वाघाने हल्ला केला. हे जगातले असे ठिकाण आहे, जिथे वाघांना पाळीव प्राण्यांप्रमाणे वागवले जाते. पर्यटक त्यांच्याबरोबर सेल्फी काढू शकतात, त्यांना अन्न भरवू शकतात इत्यादी..
सदर व्हिडीओमधील भारतीय व्यक्तीच्या किंकाळ्या ऐकणाऱ्यांचा थरकाप उडू शकतो, इतका हा भीतीदायक प्रसंग होता. सिद्धार्थ शुक्ला यांच्या पोस्टखाली अनेकांनी सदर व्यक्तीबद्दल काळजी व्यक्त केली आहे. यावर शुक्ला यांनी उत्तर देताना म्हटले की, ज्यावर हल्ला झाला तो व्यक्ती किरकोळ जखमी असून त्यावर उपचार सुरू आहेत.
एका युजरने कमेंट करताना म्हटले की, अशाप्रकारचे स्टंट टाळायला हवेत. वन्य प्राणी हे शेवटी प्राणीच असतात. त्यांच्यापासून सुरक्षित अंतर राखायला हवे, तसेच त्यांना प्रेमाने वागवावे. आपण त्यांना खायला देतो, याचा अर्थ आपण त्यांच्याबरोबर कसेही वागू, असे होऊ शकणार नाही. कारण शेवटी ते वन्य प्राणीच.
संजय पांडे नामक एका मुक्त पत्रकारानेही या व्हिडीओवर आपली प्रतिक्रिया नोंदविली आहे. ते म्हणतात, या पर्यटकाच्या जागी कदाचित मीही असू शकलो असतो. या व्हिडीओतून पर्यटनातील हा धोका लक्षात येतो. अनेक भारतीय नागरिक थायलंडमध्ये गेल्यानंतर वाघांसह फोटो आणि व्हिडीओ काढण्यासाठी इच्छुक असतात. कधी कधी सामाजिक दबावाखाली किंवा कधी जवळच्या व्यक्तीच्या सांगण्यावरून. पण वाघासारख्या वन्य प्राण्यांना शांत ठेवण्यासाठी इथे त्यांना अमली पदार्थ दिले जातात. पण वाघाचे खरे स्वरुप नियंत्रित करता येत नाही.
“अमली पदार्थाचा डोस जसा कमी होऊ लागतो, तसा वाघ पुन्हा हिंसक होऊ शकतो. त्यामुळे हा एक गंभीर धोका आहे. पर्यटन करताना आपल्याला असे काही साहसी करण्याचा मोह होऊ शकतो, पण त्यात धोकाही आहे”, असेही संजय पांडे यांनी कमेंटमध्ये सांगितले.