हॉटेलमध्ये गेलो की वेटर आपल्या दिमतीला उभे असतात. आपली ऑर्डर घेण्यासाठी, ती तयार झाली की आणून देण्यासाठी, आपल्याला पाणी, बील असे हवे नको ते सगळे देण्यासाठी वेटर हजर असतात. पण हे काम रोबोने केले तर? काहीशी अशक्य वाटणारी ही गोष्ट आता तंत्रज्ञानामुळे शक्य झाली आहे. विशेष म्हणजे हे तंत्रज्ञान आता भारतातही उपलब्ध झाले आहे. चेन्नईमध्ये अशाप्रकारे रोबो वेटर हॉटेल सुरु झाले असून त्याचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे याठिकाणी रिसेप्शनिस्टही रोबो आहेत. त्यामुळे याठिकाणी अॅडमिनच्या कामापासून ऑर्डर घेणे आणि प्रत्यक्ष पदार्थ टेबलवर पोहोचवणे अशी सगळी कामे हे रोबो करणार आहेत. या हॉटेलच्या मालकाची चेन्नईमधील शाखा ही दुसरी शाखा असेल. याआधी त्यांनी कोईम्बतूर येथे अशाचप्रकारे एक हॉटेल सुरु केले होते. तर आताची शाखा मुगलीवक्कम परोरमध्ये सुरु करण्यात आली आहे. या हॉटेल्समधील रिसेप्शनिस्ट आणि इतर रोबो इंग्रजी आणि तामीळ भाषेमध्ये संवाद साधतो.

मुगलीवक्कम पोररमधील हॉटेलमध्ये एकूण आठ रोबो आहेत. ज्यामध्ये ७ रोबो वेटर आणि एक रिसेप्शनिस्ट आहे. या रोबोची नावं अजून ठेवण्यात आली नाहीत. मात्र गिऱ्हाईकांच्या सल्ल्याने या वेटर रोबोंची नावं ठेवण्यात येणार असल्याचे मालकाने सांगितले. हॉटेलच्या टेबलवर एक टॅब ठेवण्यात आला आहे. या टॅबद्वारे गिऱ्हाईक आपल्याला हवे असलेले पदार्थ ऑर्डर करु शकतात. गिऱ्हाईकांनी सिलेक्ट केलेली ऑर्डर थेट किचनमध्ये जाते आणि किचनमधून ऑर्डर घेऊन रोबो त्या अचूक टेबलवर पोहोचवतो. सध्या हे रोबो वेटर हॉटेल जोरदार चर्चेत असून ग्राहकांमध्ये त्याबाबत उत्सुकता दिसून येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.