तमिळनाडूतील एका ४९ वर्षीय महिलेला तरुणपणी डॉक्टर होण्याची इच्छा होती. मात्र, परिस्थितीमुळे त्या वेळी ती संधी मिळू शकली नाही. अनेक वर्षांनंतर, जेव्हा त्यांच्या मुलीने NEET परीक्षेची तयारी सुरू केली, तेव्हा मुलीच्या प्रयत्नांनी आणि समर्पणाने त्यांना पुन्हा स्वप्न पाहण्याची प्रेरणा मिळाली.
NEET UG परीक्षा उत्तीर्ण होणे हे मोठं यश मानलं जातं. पण, तमिळनाडूतील आई आणि मुलीच्या जोडीने NEET सारख्या अवघड परीक्षेत यश मिळवले आहे. अमुथवल्ली मणिवन्नन आणि त्यांची मुलगी संयुक्ता या दोघींनीही NEET २०२४ च्या परिक्षेत यश मिळवले असून त्या दोघी उत्तीर्ण झाल्या आहेत. या प्रयत्नांमुळे आता मायलेकी अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरल्या आहेत.
फिजिओथेरपिस्ट आई आणि तिच्या मुलीने NEET 2024 परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केल्यानंतर आता सर्वबाजूंनी त्यांचे कौतुक होत आहे. आई अमुथवल्ली मणिवन्नन यांना PwBD कोट्यांतर्गत सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात MBBS साठी जागा मिळाली आहे. तर, त्यांची मुलगी संयुक्ता ४५० गुणांसह सर्वसाधारण किंवा अनुसूचित जातीच्या (SC) कोट्यातून प्रवेश मिळण्याची प्रतीक्षा करत आहे.
कसे मिळवले यश?
“माझी मुलगी अभ्यास करताना पाहून माझी जुनी महत्त्वाकांक्षा पुन्हा जागी झाली, तीच माझी सर्वात मोठी प्रेरणा ठरली,” असं अमुथवल्ली यांनी सांगितले. संयुक्ताने कोचिंग क्लासमध्ये प्रवेश घेतला आणि नीटसाठी जोरदार तयारी केली. तिच्या अभ्यासातील निष्ठा पाहून आईनेही तिचीच पुस्तकं घेऊन अभ्यास सुरू केला.
“आजचा अभ्यासक्रम माझ्या काळाच्या अभ्यासक्रमापेक्षा खूप वेगळा होता, पण तिच्या मदतीने मी शिकू शकले,” असे त्या आनंदाने सांगतात. संयुक्ता मात्र स्वतःचा मार्ग स्वतः ठरवू इच्छिते आणि तिच्या आईसाठी तीच खरी प्रेरणास्त्रोत ठरली आहे.
कुटुंबाचा पाठिंबा
“माझे पती आमच्या प्रवासात कायम आधारस्तंभ होते. त्यांनी आम्हा दोघींनाही अभ्यासासाठी सतत प्रोत्साहन दिलं,” असे अमुथवल्ली अभिमानाने म्हणाल्या. ही यशोगाथा हे सिद्ध करते की योग्य प्रयत्न, आत्मविश्वास आणि कुटुंबाचा पाठिंबा असला तर कोणतेही स्वप्न वयाच्या कुठल्याही टप्प्यावर पूर्ण करता येते.