तेलंगणातील जोगुलम्बा गडवाल जिल्ह्यातील एका खासगी रुग्णालयात डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. कारण या रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी एका मुलावर शस्त्रक्रिया करताना त्याच्या जखमेला टाके घालण्याऐवजी चक्क फेविक्विक लावल्याची घटना उघडकीस आली आहे. ही बाब उघडकीस येताच पीडित मुलाच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.
खेळताना झाली जखमी –
मिळालेल्या माहितीनुसार, जोगुलम्बा गडवाला जिल्ह्यातील आइजा येथील खासगी रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी टाके घालण्याऐवजी फेविक्विक लावून जखमी मुलावर उपचार केले. मुलगा खेळताना पडल्यामुळे जखमी झाला होता. कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यातील लिंगसोगुर येथील रहिवासी असलेले वंशकृष्ण हे पत्नी सुनीता आणि मुलगा प्रवीण यांच्यासोबत तेलंगणामध्ये राहणाऱ्या नातेवाईकांच्या लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी आले होते. या लग्न समारंभात दरम्यान, खेळताना प्रवीण पडला होता.
जखमेवर लावलं फेविक्विक –
प्रवीणच्या डाव्या डोळ्याच्या वरच्या भागात खोलवर जखम झाली होती, त्यामुळे त्याला खासगी रुग्णालयात नेण्यात आले होते. यावेळी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी जखमेवर उपचार करताना टाके घालण्याऐवजी चक्क फेविक्विक लावले. हा प्रकार उघडकीस येताच मुलाच्या वडिलांनी रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार केली. त्यानंतर निष्काळजीपणा करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
याबाबत मुलाचे वडील वंशकृष्ण यांनी आइजा पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून हे प्रकरण चर्चेत आल्यानंतर या घटनेचा तपास सुरू केल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेनंतर पीडित मुलाच्या कुटुंबीयांमध्ये खळबळ उडाली असून, मुलावर केलेले चुकीचे उपचार धोकादायक ठरु शकते, असं मुलाचे पालक म्हणत आहेत.