१ मे हा मराठी लोकांसाठी ‘महाराष्ट्र दिन’ आहे, तर हाच दिवस बहुतांश जगात ‘कामगार दिन’ म्हणून साजरा केला जातो. भारतातील सर्व कामगारांना एका मराठी व्यक्तीमुळे रविवारची सुट्टी मिळायला सुरूवात झाली. कामगार दिनाचे औचित्य साधत आपण याविषयी माहिती जाणून घेऊयात..

इंग्रजांच्या काळात मीलमध्ये काम करणाऱ्या कामगारांना सातही दिवस काम करावे लागत होते. आठवड्यात एकही दिवस हक्काची सुटी मिळत नसे. त्याकाळी ब्रिटिश अधिकारी रविवारी चर्चमध्ये प्रार्थना करण्यासाठी जात होते. मात्र, कामगारांसाठी अशी काही परंपरा नव्हती. कामगारांचे नेते नारायण मेघाजी लोखंडे यांनी १८८४ मध्ये मुंबईत बॉम्बे मिल हॅण्ड्‌स असोसिएशन स्थापना केली. त्यांनी इंग्रजांसमोर साप्ताहिक सुट्टीचा प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावात त्यांनी असे नमूद केले की, आम्ही स्वत:साठी आणि कुटुंबासाठी सहा दिवस काम करतो. त्यामुळे आठवड्याच्या शेवटी एक दिवस आम्हाला देशाची सेवा करण्यासाठी तसेच काही सामाजिक कामे करण्यासाठी मिळावा. तसेच रविवार खंडोबा या देवाचा वार असल्याने त्या दिवशी साप्ताहिक सुट्टी मिळावी.

नेते नारायण मेघाजी लोखंडे यांनी तब्बल सात वर्ष रविवारच्या सुट्टीसाठी लढा दिला. २४ एप्रिल १८९० रोजी लोखंडे यांच्या नेतृत्त्वाखाली हजारो मिल कामगारांनी मोर्चा काढला. लोखंडे यांनी केलेला तीव्र संघर्षाची दखल घ्यावी लागली. मिलमालकांनी बैठक घेऊन रविवारच्या सार्वजनिक सुटीची मागणी मान्य केली. १८८४मध्ये रविवारच्या सुट्टीसाठी सुरू झालेला संघर्ष १० जून १८९० रोजी संपला.

कोण आहेत नारायण मेघाजी लोखंडे ?
भारतीयांना हक्काची रविवारची सुट्टी मिळण्यात एका मराठी व्यक्तीचा सिंहाचा वाटा आहे. सरकारी क्षेत्राबरोबरच खाजगी क्षेत्रातही रविवारच्या सुटीचं नातं जोडलं गेलेय ते भारतातल्या कामगार चळवळीचे पहिले नेते नारायण मेघाजी लोखंडे यांच्यामुळेच. १८८४मध्ये लोखंडे यांनी कामगारासाठी लढा दिला. त्यांचा लढा तब्बल सात वर्ष चालला. यादरम्यान त्यांनी अनेक आंदोलने केली. अखेर १० जून १८९० रोजी इंग्रंज सरकारने भारतीयांना रविवारची सुट्टी जाहीर केली. इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाल्यानंतरही भारतामध्ये आजही रविवारची सुट्टी आहे. लोखंडे यांना ट्रेड यूनियन आंदोलनाचे जनक म्हणूनही ओळखले जाते. लोखंडे महत्मा फुले यांचे जवळचे सहकारी होते. २००५ मध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांच्या सन्मानार्थ भारत सरकारने पोस्टाचे तिकीट जारी केले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

म्हणून काही पाश्चिमात्य देशात रविवारी सुट्टी?
सर्वसाधारणपणे ज्या देशांवर ब्रिटिशांनी राज्य केले त्या देशांमध्ये रविवार हा सुटीचा दिवस असतो. याचे कारणही मजेशीर आहे. सहा दिवसात सृष्टी निर्माण केल्यावर देवाने सातव्या दिवशी विश्रांती घेतली असे बायबलमध्ये परमेश्वराने सृष्टी कशी निर्माण केली त्याचे वर्णन आहे. पाश्चिमात्यांचा आठवडा सोमवार ते शनिवार असाच असतो आणि त्यामुळे सहा दिवस काम केल्यावर ते सातव्या दिवशी सुटी घेतात. चर्चमध्ये रविवारी सकाळी सकाळी जाऊन प्रार्थना करतात.