जंगलाचा एक नियम आहे, जो शक्तीशाली असेल तो टीकेल. खरं तर हाच निसर्ग नियमच आहे. याचा प्रचिती आपल्याला अनेकदा वेगवेगळ्या व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून तसेच डिस्कव्हरी, नॅशनल जिओग्राफीसारख्या चॅनलवरील कार्यक्रमांच्या माध्यमातून येत असते. सध्या अशाच प्रकारचा एक थक्क करणारा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये सीगल पक्षी संपूर्ण ससा एका घासात जिवंत गिळताना दिसत आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये सीगल पक्षी सशाची शिकार करतो. हा पक्षी आपल्या चोचीने सशाला जिवंत पकडतो आणि पुढच्या क्षणाला तो हा ससा एका फटक्यात जिवंत गिळतो. हा व्हिडिओ वेल्सजवळ असणाऱ्या पेम्ब्रुशजवळच्या (Pembrokeshire) स्कोमर बेटांवरील असल्याचे सांगितले जात आहे. ज्या पर्यावरण प्रेमींनी हा व्हिडिओ शूट केला त्यांना हा पक्षी सशाला निवांत खाईल असं वाटलं होतं. मात्र या पक्षाने एका घासात संपूर्ण ससा जिवंत गिळल्याचे पाहून पाहणाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसल्याचे, डेली मेलने आपल्या वृत्तामध्ये म्हटलं आहे.
स्कोमर बेटांवरील वन्यजीव संरक्षणाची जबाबदारी वाइल्ड लाइफ ट्रस्ट ऑफ साऊथ अॅण्ड वेस्ट वेल्सवर आहे. ससे हे सीगल पक्षांचे प्रमुख खाद्य आहे. “ससे हे या पक्षांच्या अन्नाचा प्रमुख भाग आहेत. जेव्हा इतर काहीही उपलब्ध नसतं तेव्हा हे पक्षी सशांवर आपले पोट भरतात,” असं ट्रस्टचे कर्मचारी सांगतात.