अनेकदा सेलिब्रेटी, आजी-माजी खेळाडू यांना सोशल मीडियावर त्यांच्या भूमिकेविषयी टीकेला सामोरं जावं लागतं. सोशल मीडियावरील ट्रोलिंग आणि हेट कँपेनमुळे अनेक सेलिब्रेटी कोणत्याही विषयावर व्यक्त होण्याचं टाळत असतात. मात्र काही खेळाडू, सेलिब्रेटी हे कशाचीही पर्वा न बाळगता, अनेक विषयांवर व्यक्त होत असतात. भारताचा माजी खेळाडू इरफान पठाण हे अशा खेळाडूंपैकी एक नाव. करोना विषाणूच्या प्रादुर्भाव काळात इरफान आणि युसूफ हे पठाण बंधू सामाजिक कार्यात पुढे होते. यावेळी त्यांचं सोशल मीडियावर कौतुकही झालं.

काही दिवसांपूर्वी आपल्या कारकिर्दीविषयी दिलेल्या मुलाखतीत इरफानने आपला खेळ खावावण्यासाठी माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपल यांना जबाबदार धरता येणार नाही असं म्हटलं होतं. सचिन तेंडुलकरच्या सल्ल्याने मी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी यायला लागलो होतो, असं म्हटलं. सोशल मीडियावर ही बातमी आल्यानंतर, एका युजरने इरफान पठाणची तुलना मोहम्मद हाफीजशी केली. इरफानने याचा स्क्रिनशॉट आपल्या ट्विटर अकाऊंटवर टाकत, काही लोकांची अशी मानसिकता असते, आपण कुठे चाललोय असा उद्विग्न सवाल केला आहे.

इरफानच्या या ट्विटवर काही सेलिब्रेटींसह चाहत्यांनी त्याला आपला पाठींबा दर्शवला आहे.

डावखुऱ्या इरफान पठाणने भारताकडून २९ कसोटी, २४ टी-२० आणि १२० वन-डे सामने खेळले आहेत. काही महिन्यांपूर्वीच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला.