उरीमध्ये झालेल्या हल्ल्यात १९ भारतीय सैनिक शहीद झाल्यापासून भारत आणि पाकिस्तानमधील संबंध बिघडले. भारतीय सेनेने कंठस्नान घातलेल्या बुरहान वानी या हिज्बुलच्या कमांडरची पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरिफ यांनी संयुक्त राष्टसंघाच्या आमसभेमध्ये वाखाणणी केल्यानंतर परिस्थिती अधिकच खराब होत गेली. अलिकडेच भारतीय सेनेकडून पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राइक करण्यात आले. यानंतर हा मुद्दा अधिकच चिघळला. या रणधुमाळीत सोशल मीडियावरदेखील चारही बाजुंनी भारत आणि पाकिस्तानवरील पोस्टचाच धुरळा उडताना दिसतो आहे.
पाकिस्तानच्या इस्लमाबादमधील एका तरुणीने भारत-पाकिस्तान संबंधांबाबत केलेली फेसबुक पोस्ट चांगलीच व्हारल होत आहे. ही पोस्ट हजारोंच्या संख्येने लाइक्स आणि शेअर करण्यात आली आहे. भारतीय सेनेतर्फे सर्जिकल स्ट्राइकची अधिकृत घोषणा केल्यानंतर अलीजे जफर नावाच्या तरुणीने ही पोस्ट लिहिली. भारत आणि पाकिस्तान एखाद्या घटस्फोटित जोडप्याप्रमाणे असल्याचे तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. अनेक वर्षांपूर्वी घेण्यात आलेल्या एका निर्णयाचे ओझे दोघेही वाहत असल्याचे तिने म्हटले आहे.
भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या संबंधांबाबत लिहिलेल्या पोस्टमध्ये अलीजे जफर म्हणते, ‘एका क्षणी जगासाठी आम्ही आपापसात भांडणारी एकाच आईची लेकरे असतो. तर पुढच्या क्षणी तडजोडीत कोणाचे अधिक नुकसान झाले यावर लढणाऱ्या घटस्फोटित जोडप्याप्रमाणे असतो. विभाजनामुळे निर्माण झालेल्या घावांवर कोणताच उपाय नसल्याचे वाटते. अशा परिस्थितीत दु:ख हे दोन्ही बाजूंना असल्याचे दोन्ही देशांनी समजून घ्यायला हवे.’
बॉलिवूडविषयी ती म्हणते, ‘जेव्हा अमिताभ बच्चन रुग्णालयात दाखल होतात, तेव्हा ते लवकर बरे व्हावेत यासाठी आम्ही प्रार्थना करतो. जेव्हा रणबीर कपूरची चित्रपट चांगली कामगिरी करतो, तेव्हा ऋषी कपूर आणि नीतू कपूरपेक्षा अधिक आनंद आम्हाला होतो. किशोर आणि रफीच्या आवाजातील रोमान्स अन्य कोणाच्या आवाजात नसल्याचे आम्ही नाकारात नाही. त्यांच्या स्मारकात आमचा इतिहास आहे आणि आमच्या भाषेत त्यांची मुळे आहेत.’
अलीजेने कारगिलविषयीही लिहिले आहे. एकमेकांवरील आरोप प्रत्यारोपांविषयी ती लिहिते, ‘काश्मीरमध्ये तुम्ही काय करता आहात ते पाहा. तुम्ही बलुचिस्तानमध्ये काय करत आहात ते पाहा. उरीमध्ये तुम्ही पहिला हल्ला केला. तुम्ही कारगिल विसरलात का? तुम्ही सुरुवात केली! नाही! पहिल्यांदा सुरुवात तुम्ही केली!’
शेवटी प्रेमाचा संदेश देताना ती म्हणते, ‘जेव्हा सीमेपलीकडील माझ्या खास मित्र-मैत्रिणींना मी संदेश पाठवून देशातील परिस्थितीबाबत सांगितले. तेव्हा सरकार काय करते याच्याशी आम्हाला देणे-घेणे नसून, आम्ही तुझ्यावर नेहमीच प्रेम करत राहू, असा प्रतिसंदेश मिळाला. ‘केवळ एकच संदेश आहे ज्यावर आपल्याला लक्षकेंद्रित करायला हवे आणि तो आहे आपापसातील प्रेम.’
अलीजेची एफबी पोस्ट