राजस्थानमधील जालोरमध्ये एका ७७ वर्षीय वृद्धाचा आश्चर्यचकित करणारा प्रवास समोर आला आहे. ७७ वर्षीय या तरुणाला शिक्षणाची एवढी आवड आहे की दहावीत ५६ वेळा नापास होऊनही त्याची हिंमत खचलेली नाही. ५६ वेळा नापास झाल्यानंतर या व्यक्तीने ५७व्यांदा पुन्हा परीक्षा दिली आणि शेवटी ते उत्तीर्ण झाले. जालोर जिल्ह्यातील हुकमदास वैष्णव यांनी वयाची ७७ वर्षे पूर्ण केली असली तरी, दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर आता त्यांनी बारावीच्या परीक्षेचा अर्जही भरला आहे.
जालोर जिल्ह्यातील सरदारगड येथे राहणारे हुकमदास वैष्णव तरुणांसाठी आदर्श ठरले आहेत. हुकमदास यांनी १९६२ पासून दहावी पास होण्यासाठी प्रयत्न केले, जे २०१९ मध्ये यशस्वी झाले. हुकमदास यांना आठवी पास केल्यानंतर नोकरी मिळाली होती. पण सरकारी नोकरी मिळाल्यानंतरही त्यांची अभ्यासाची आवड कमी झाली नाही. सरकारी नोकरी मिळाल्यानंतरही त्यांनी दहावी पास होण्यासाठी अभ्यास सुरू केला, मात्र १९६२ ते २०१८ पर्यंत हुकमदास वैष्णव दहावीत ५६ वेळा नापास झाले. अखेर २०१९ मध्ये, हुकमदास वैष्णव ५७ व्यांदा दहावीची परीक्षा देऊन यशस्वी झाले.
हुकुमदास वैष्णव यांची दहावी पास होण्यासाठीची धडपड आणि कथाही खूप रंजक आहे. हुकुमदास वैष्णव यांनी जालोर शहरातील शासकीय उच्च माध्यमिक विद्यालय अर्बन येथे १२वी कला वर्गातून अर्ज केला आहे. विशेष म्हणजे आता त्यांच्या नातवानेही शालेय शिक्षण पूर्ण केले आहे.
हुकम दास यांनी सांगितले की, दहावीत पहिल्यांदा नापास झाल्यानंतरही वयाच्या १८व्या वर्षी त्यांना सरकारी नोकरी मिळाली. भूजल विभागात चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याची नोकरी मिळाल्यानंतरही त्यांचे शिक्षणावरील प्रेम कमी झाले नाही. जेव्हा त्यांनी दहावीचा फॉर्म भरला तेव्हा मित्रांनी त्यांना नोकरी लागली आहे, आता अभ्यास सोड, असे सांगितले. मित्रांच्या याच वक्तव्यावरुन प्रेरणा घेऊन त्यांनी दहावी उत्तीर्ण होण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांचा हा निर्णय ५७ वर्षांनंतर पूर्ण झाला. हुकमदास वैष्णव ७७ वर्षांचे झाले असतील, पण त्यांची अभ्यासाची आवड आजही कायम आहे. हुकुम दास वैष्णव यांनी बारावी उत्तीर्ण होण्यासाठी अर्ज केला आहे.