आजच्या काळात जाहिरात ही पासष्टावी कला मानली जाते. ही कला ज्याला अवगत त्याची मातीही सोन्याच्या भावात विकली जाईल अन् ज्याला या कलेचं सामर्थ्य समजलं नाही त्याची दुर्मिळ वस्तूही खपली जाणार नाही असं या कलेचं कौतुक अनेकजण करतात. जाहिरातीमुळेच आपला फायदा होऊ शकतो हा फंडा अनेकांना कळला आहे, पण ही जाहिरात जितक्या हटक्या पद्धतीनं करू तितकी तिला प्रसिद्धी मिळण्याची शक्यता जास्त. तेव्हा हाच फंडा हेरून जपानमधल्या एका सौंदर्यप्रसाधन कंपनीनं जाहिरातबाजीसाठी एक विचित्र आणि यापूर्वी कोणीही न लढवलेली शक्कल शोधून काढली आहे.

जपानमधल्या वाकिनो अॅड कंपनीनं फार घाम न गाळता लिबर्टा ब्युटी प्रोडक्ट कंपनीची एक विचित्र पण तितकीच हटके पद्धतीनं जाहिरातबाजी केली आहे. ही ब्युटी कंपनी काखेसाठी वापरण्यात येणारे सौंदर्यप्रसाधनं तयार करते. त्यामुळे या उत्पादनाच्या जाहिरातीचे स्टिकर्स त्यांनी महिलांना काखेत चिटकवायला दिले आहेत. यासाठी प्रत्येक महिलेला ताशी १० हजार येन म्हणजे जवळपास ६ हजार रुपये मानधन म्हणून दिलं आहे.

ट्रेन किंवा बस प्रवासात अनेकदा संतुलनासाठी महिला वरचे हँडल पकडतात अशावेळी काखेत चिटकवलेले जाहिरातीचे स्टिकर्स नजरेस पडतील आणि त्याची चांगली जाहिराती होईल असं कंपनीचं म्हणणं आहे. खरं तर आतापर्यंत अशी जाहिरात कोणीही केली नव्हती त्यामुळे या जाहिरातीची चर्चा सोशल मीडियावर अधिक होत आहे. माणसांवर जाहिरातींचे स्टिकर्स चिटकवून अशा प्रकारे जाहिरातबाजी करण्याची या कंपनीची ही काही पहिलीच वेळ नाही याआधीही या कंपनीनं अशाच वादग्रस्त प्रकारे जाहिरातबाजी केली होती.