कोर्टात सुनावणीदरम्यान न्यायाधीश आरोपीवर प्रश्नांची सरबत्ती करताना तुम्ही अनेकदा बघितलं असेल, पण अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये एक विचित्र प्रकार घडलाय. इथे एका आरोपीला व्हर्चुअल कोर्टात महिला न्यायाधीशासमोर हजर करण्यात आलं आणि आरोपीने चक्क महिला न्यायाधीशासोबतच ‘फ्लर्ट’ करण्यास सुरूवात केली. आरोपीने फ्लर्ट केल्यानंतर महिला न्यायाधीशाच्या चेहऱ्यावरही हसू आलं पण त्याची शिक्षा काही कमी केली नाही. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

फ्लोरिडामध्ये चोरीचा आरोप असलेल्या एका व्यक्तीला गुरूवारी व्हर्च्युअल कोर्टात हजर करण्यात आलं. डेमेट्रियस लेविस असं आरोपीचं नाव असून त्याला झूम अ‍ॅपद्वारे ब्रोवार्ड काउंटीच्या न्यायाधीश तबीथा ब्लॅकमोन यांच्यासमोर हजर करण्यात आलं. यावेळी त्याने चक्क महिला न्यायाधीशासोबतच फ्लर्ट करण्यास सुरूवात केली. काही क्षणासाठी न्यायाधीश देखील हैराण झाल्या.

सुनावणीला सुरूवात होताच आरोपीने महिला न्यायाधीशांना, “जज… तुम्ही खूप सुंदर आहात, मला तुम्हाला फक्त हेच सांगायचंय की तुम्ही खरंच खूप सुंदर दिसतात…आय लव्ह यू…आय लव्ह यू…” असं म्हटलं. त्याचं बोलणं ऐकून तबीथा ब्लॅकमोन यांच्या चेहऱ्यावरही काही क्षणासाठी हसू आलं. कौतुक केल्याबद्दल त्यांनी आरोपीचे आभार मानले पण खुशामत करण्याचा प्रयत्न दुसरीकडे कर इथे त्याचा काहीही उपयोग होणार नाही, असंही त्याला सुनावलं आणि नंतर 5,000 डॉलर बाँडवर त्याला तुरूंगात पाठवण्याचा आदेश दिला. बघा व्हिडिओ :

आरोपी लेविस याने आधीही एका गुन्ह्यात चार वर्ष तुरूंगवासाची शिक्षा भोगली आहे. 2019 मध्ये त्याची तुरूंगातून सुटका झाली होती. दरम्यान, न्यायाधीशासोबत फ्लर्ट करतानाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.