केरळमधील एका व्यक्तीचं डेटिंग अ‍ॅपवरील प्रोफाइल सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. सोशल मीडियावर या प्रोफाइलचे स्क्रीशॉर्ट व्हायरल झाले आहे. यामागील महत्वाचं कारण म्हणजे ही व्यक्ती डेटींग अ‍ॅपवर जोडीदार शोधण्यासाठी लॉगइन झाली नसून मुंबईत घराच्या शोधात आहे. मुंबईमध्ये घर शोधण्यासाठी या व्यक्तीने घरांसंदर्भातील माहिती देणाऱ्या वेबसाईट्सऐवजी डेटिंग अ‍ॅपची मदत घेतलीय.

एका ट्विटर युझरने या घराच्या शोधात असणाऱ्या व्यक्तीच्या प्रोफाइलचे स्क्रीनशॉट शेअर केलेत. या प्रोफाइलच्या बायोमध्ये, “मी एखाद्या आकर्षक व्यक्तीच्या शोधात नसून मुंबईमध्ये फ्लॅट (घर) शोधतोय,” असं लिहिलेलं आहे. पुढील स्क्रीनशॉटमध्ये या व्यक्तीने माझ्या प्रोफाइलवर आल्यानंतर ज्यांना मला मदत करावी वाटतेय त्यांनी राइट स्वाइप करा असं म्हटल्याचं दिसत आहे. आपण मुंबईत घर शोधत असून आपल्याला फारसं हिंदी येत नाही त्यामुळे मला पश्चिम रेल्वे मार्गाला लागून असलेल्या भागांमध्ये घर शोधण्यासाठी मदत करायची असल्यास राईट स्वाइप करा असं त्याने प्रोफाइलच्या दर्शनी भागात नमूद केलंय.

तसेच माझ्या हृदयापर्यंत पोहचण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे, “ब्रोकरेज नसणाऱ्या अंधेरीमधील फ्लॅट्ससंदर्भातील माहिती पाठवा,” असं या डिस्क्रीप्शनमध्ये लिहिलेलं आहे. मात्र त्यावेळेस घर चांगलं असेल तर ब्रोकरेज द्यायलाही आपण तयार असल्याचं त्याने नमूद केलंय. “तुम्ही बम्बेलवर तुमचा जोडीदार शोधत असाल तर ही व्यक्ती मुंबईत घर शोधतेय,” असं म्हणत या व्यक्तीच्या प्रोफाइलचे स्क्रीनशॉट ट्विटरवरुन व्हायरल करण्यात आलेत.

अनेकांनी प्रेम शोधण्याच्या जागी घर शोधणाऱ्या या व्यक्तीला मजेदार सल्ले दिले आहेत. काहींनी तुला एकवेळेस खरं प्रेम सापडेल पण मुंबई सहजपणे घर सापडणार नाही, असं म्हटलंय. तर काहींनी अनेकजण या प्लॅटफॉर्मवर समोरच्याच्या हृदयामध्ये जागा शोधतात आणि हा इथे रहायला जागा शोधतोय, असं म्हणत या प्रोफाइलवर मजेदार कमेंट्स केल्यात.