टी-२० विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर सोशल मीडियावर ट्रोलर्सने भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीवर जहरी टीका केली. तसेच त्याच्यावर धार्मिक शेरेबाजी केली. यानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने भारतीय क्रिकेट संघातील सर्व खेळाडू देशासाठी लढत असल्याचं सांगत शमीच्या योगदानाची आठवण करून दिली. मात्र, यानंतर ट्रोलरने विराटच्या कुटुंबालाही धमक्या दिल्या. यातून विराटची १० महिन्यांच्या चिमुकली मुलगीही सुटली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ट्विटरवरील एका अज्ञात अकाऊंटवरून तिलाही धमकी आली. यावरून अनेकांनी ट्रोल करणाऱ्यांना धारेवर धरलं तसेच हा विकृतपणा खपवून घेणार नसल्याची भूमिका घेतली. मात्र, यानंतर हे अकाऊंट पाकिस्तानमधील असल्याचा दावा करण्यात आला. मात्र, विराटच्या मुलीला विकृतपणे ट्रोल करणाऱ्याच्या ट्विटर अकाऊंटची तपासणी केली असता हे अकाऊंट पाकिस्तानी नाही तर भारतीयच असल्याचं स्पष्ट झालं. ‘अल्ट न्यूज’ (Alt News) या फेक न्यूजची तथ्य तपासणी करणाऱ्या संकेतस्थळाने याबाबत खुलासा केलाय.

विकृत ट्रोलिंगविरोधात सोशल मीडियावर संताप

विराट कोहलीच्या मुलीला विकृतपणे धमकी मिळाल्यानंतर अनेकांनी ट्रोलिंगच्या या विकृतीविरोधात भूमिका घेतल्यात. तसेच हे खपवून घेणार नसल्याचं सांगितलं. मात्र, यानंतर ट्रोलर्सने आपल्यावरील असंतोष दुसरीकडे वळवण्यासाठी संबंधित ट्रोलिंग ट्विटर खातं पाकिस्तानमधील असल्याचा दावा केला. याबाबत ट्विटरवर अनेकांनी हे खातं पाकिस्तानमधील असल्याचा दावा करणारे ट्वीट्स केले. त्यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला. मात्र, अखेर अल्ट न्यूजने या ट्विटर खात्याची तांत्रिक बाजू तपासत त्याचं मूळ शोधून काढलं.

ठराविक काळानंतर वारंवार ट्रोलिंग केलेल्या खात्याच्या युजरनेममध्ये बदल

विशेष म्हणजे विकृतपणे ट्रोलिंग करणारे आपल्यावरील कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी आणि लोकांची दिशाभूल करण्यासाठी अनेक क्लुप्त्या करताना समोर आलंय. अल्ट न्यूजने संबंधित ट्विटर खात्याचा विशेष ट्विटर नंबर (Twitter ID) शोधून काढला. ट्विटर कोणत्याही वापरकर्त्याला युजरनेम बदलण्याची परवानगी देतं. मात्र, कोणतंही खातं ट्विटरवर तयार झालं की सुरुवातीलाच त्याचा युनिक आयडेंटिटी नंबर तयार होतो यालाच ट्विटर आयडी म्हणतात. या ट्विटर आयडीमुळे या खातेधारकाने अनेकदा आपलं युजरनेम बदलल्याचं उघड झालं.

ट्रोलिंग करणारं खातं पाकिस्तानमधील नाही, तर भारतातीलच

विशेष म्हणजे जुन्या युजरनेमवरून या खात्यावर निफ्टीमधील (NIFTY) गुंतवणुकीवरही ट्वीट करण्यात आलं होतं. निफ्टी ही भारतीय शेअर बाजाराची इंडेक्स आहे. त्यामुळे हे खातं चालवणारी व्यक्ती भारतीय असल्याचा संशय बळावला. याला दुजोरा या खात्यावरुन खूप आधी रिट्वीट करण्यात आलेल्या तेलगू ट्वीटमुळे मिळाला.

हेही वाचा : विराट कोहलीच्या १० महिन्यांच्या मुलीला धमक्या, दिल्ली महिला आयोगानं उचललं ‘हे’ पाऊल!

यानंतर अधिक तपास केला असता ही व्यक्ती हैदराबादमधील असल्याचंही उघड झालं. या खात्यावरून भाजपा नेत्यांशी संलग्न ओप इंडिया नावाच्या हँडलवरील ट्विट्स देखील रिट्वीट झाल्याचं समोर आलं. त्यामुळे विराट कोहलीच्या मुलीला विकृतपणे ट्रोल करणारं खातं पाकिस्तानमधील नसून भारतातीलच असल्याचं स्पष्ट झालं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know who is behind twitter account trolling indian cricketer virat kohli daughter pbs
First published on: 03-11-2021 at 11:39 IST