अनेकदा असं होतं की आपण तासन् तास फोन चार्ज करत ठेवतो तो केव्हाचा चार्जही झालेलाही असतो पण आपण कामाच्या गडबडीत ते विसरून जातो. रात्रीच्यावेळीही तसंच होतं. फोनवर बोलून मोबाइलची बॅटरी पूर्ण उतरते, कधी कधी फोनही स्विच ऑफ होतो. तेव्हा रात्री झोपताना अनेकजण फोन चार्जिंगलाच लावून झोपतात. ‘सकाळपर्यंत होईल फूल चार्ज, मग बंद करू’ या विचाराने रात्रभर चार्जिंग सुरुच असते. तुम्हीही असाच प्रकार करत असाल तर तो वेळीच थांबवा. कारण यामुळे तुमचा फोन आणि त्याची बॅटरी लवकर खराब होण्याचा धोका असतो.
स्मार्टफोनमध्ये एक विशिष्ट तंत्र असते, जेव्हा तुमचा फोन पूर्णपणे चार्ज होतो, तेव्हा बॅटरीला मिळणारा विद्युत प्रवाह कसा नियोजित करायचा हे त्याला माहिती असते. त्यामुळे डिव्हाइसमध्ये जाणाऱ्या विद्युत प्रवाहावर आपसुकच नियंत्रण राहते. हल्ली येणाऱ्या स्मार्टफोनमधल्या बॅटरी lithium ion च्या असतात. तेव्हा मर्यादेपेक्षा जर जास्तवेळ या बॅटरी चार्ज झाल्या तर त्या ओव्हरहिंटीग व्हायला सुरूवात होते. यामुळे बॅटरीचं आयुष्य कमी होऊ शकतं. तेव्हा रात्रभर शक्यतो फोन चार्ज करणं टाळावं. एखादं दुसऱ्यावेळेला हे ठिक आहे. पण, नेहमीच चार्जिंग फुल होऊन ओव्हरहिंटिंग होत राहिलं तर मात्र बॅटरी खराब होऊ शकते. अनेकदा बॅटरीचा विस्फोट होण्याचा धोकाही असतो. अर्थात हे फार कमी प्रमाणात होतं. पण उगाच विषाची परीक्षा कशाला घ्या ना? म्हणूनच फोन चार्ज करताना पूर्णपणे दक्षता घ्या.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या मोबाइलसोबत मिळालेला ओरिजनल चार्जर खराब झाला असेल तर फोनसाठी नवीन चार्जर निवडतानाही काळजी घ्या. अनेकजण ओरिजनल चार्जर महाग असतो म्हणून तो घेण्यास टाळाटाळ करतात. पण एखाद्या स्वस्त चार्जरमुळे फोन चार्ज करताना बॅटरीलाही त्याचा धोका निर्माण शकतो. तेव्हा, चार्जर निवडतानाही तेवढीच दक्षता घ्या. या दोन अगदी सोप्या गोष्टी आहेत जर तुम्ही त्या केल्यात तर नक्कीच तुमच्या फोनची बॅटरी लाईफ आणखी वाढू शकते.