पंतप्रधान नरेंद्र मोदी ४ जुलैपासून तीन दिवसांसाठी इस्त्रायलच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यावर मोदींचं स्वागत करण्यासाठी लिओरा इत्झॅक हिची निवड करण्यात आलीय. या दौऱ्यादरम्यान लिओराला भारत आणि इस्त्रायल या दोन्ही देशांचं राष्ट्रगीत गाण्याचा मान देण्यात आलाय. भारतीय वंशाची असलेल्या लिओराचा जन्म इस्त्रायमध्येच झाला. तिचे आई-वडील मूळ मुंबईतले. वयाच्या पंधराव्या वर्षी शास्त्रीय संगीताचे धडे घेण्यासाठी लिओरा भारतात आली. पुण्यातल्या एका संगीत अकादमीत तिने शास्त्रीय संगीताचे धडे घेतले.

वाचा : ‘BMW’ चा फुलफॉर्म माहितीये?

पद्मा तळवळकर आणि पंडित सुरेश तळवळकर यांच्या संगीत तालमीत तयार झाल्यानंतर ती भजन आणि गझलदेखील शिकली. बॉलिवूडमध्ये अनेक आघाडीच्या गायकांसोबत लिओराने काम केलंय, पण तिची कारकीर्द म्हणावी तशी फुलली नाही त्यामुळे ती इस्त्रायलमध्ये परतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तीन दिवसांच्या इस्त्रायल दौऱ्यावर आहेत तेव्हा या कार्यक्रमात भारतीय राष्ट्रगीत गाण्याचा मान तिला मिळाला आहे. २०१५ साली राष्ट्रपती प्रणव मुखर्जी जेव्हा इस्त्रायल दौऱ्यावर होते तेव्हा स्नेहभोजनाच्या कार्यक्रमात लिओराने गाणं गायलं होतं.

वाचा : रिक्षाचालकापासून ते कोट्यधीश हा ‘त्याचा’ प्रवास तुम्हालाही प्रेरणा देईल

मोदींच्या इस्त्रायल दौऱ्याबाबत तिथल्या प्रसारमाध्यमातही एकूणच सकारात्मक वातावरण आहे. या दौऱ्याआधीच तिथेही मोदी लाटेचा करिष्मा पाहायला मिळाला. ‘जागे व्हा, जगातील सर्वात महत्त्वाचे पंतप्रधान येत आहे’, या मथळ्याखाली अनेक वृत्तपत्रांमध्ये मोदींचे कौतुक करणारे लेख छापण्यात आले आहे. इस्त्रायल दौरा करणारे मोदी भारताचे पहिले पंतप्रधान आहेत. इस्त्रायलच्या ७० वर्षांच्या इतिहासात भारताच्या पंतप्रधानाने आमच्या देशाचा दौरा केला नव्हता. मी त्यांच्या स्वागतासाठी उत्सुक आहे असे इस्त्रायलच्या पंतप्रधानांनी म्हटले आहे.