Students Viral Video: सोशल मीडियावर शाळेतील विद्यार्थ्यांच्या एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एका वाहनचालकाने विद्यार्थ्यांच्या लोंढेच्या लोंढे एका क्रुझरमध्ये खचाखच भरल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. पठ्ठ्यानं वाहनात एव्हढी मोठी आसनव्यवस्था नसतानाही विद्यार्थ्यांना कोंबून क्रुझरमध्ये बसवल्याने एकप्रकारे अपघातालाच आमंत्रण दिल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. विद्यार्थ्यांनी भरगच्च भरलेल्या या वाहनाचा व्हिडीओ रस्त्यावर असलेल्या एका व्यक्तीने कॅमेरात कैद केला आहे. हा धक्कादायक व्हिडीओ पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
वाहनचालकाने दिलं अपघाताला आमंत्रण
काही ठिकाणी शाळा गावापासून दूर असल्याने विद्यार्थ्यांना कित्येक किलोमीटर अंतर पार करावे लागते. अशा परिस्थितीत विद्यार्थी सायकलनेही प्रवास करत असल्याचं आपण पाहतो. तर काही विद्यार्थी पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापरही करताना दिसतात. तसंच ग्रामिण भागात खासगी वाहनांमध्ये अनेक विद्यार्थी गर्दीत प्रवास करताना दिसतात. या कारणामुळं अनेकदा अपघात होण्याची शक्यता निर्माण होते. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेतची वाहन चालक काळजी घेत नाहीत. परिणामी, विद्यार्थ्यांचा रस्त्यावरून प्रवास करताना अपघात झाल्याच्या अनेक घटनाही समोर आल्या आहेत.
इथे पाहा व्हिडीओ
@NarendraNeer007 नावाच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. “धोकादायक पद्धतीने विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणारा वाहन चालक, खूप घातक प्रवास होऊ शकतो…” असं कॅप्शनही या युजरने दिलं आहे. हा थक्क करणारा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. पैशांचा अती लोभ असणाऱ्या काही माणसांना कुणाच्या जीवाची पर्वा नसते, असंच या व्हिडीओला पाहिल्यानंतर म्हणता येईल. व्हिडीओ सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत अनेकांनी प्रश्न उपस्थित केला आहे. वाहनचालकाने धोका पत्करून विद्यार्थ्यांचा शाळेत नेण्यासाठी गाडीमध्ये बसवल्याने नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
