यूट्युबवर हटके व्हिडिओंची चलती असते. अशा व्हिडिओंना मागणीही चांगली असते, म्हणूच या माध्यमाचा वापर करून अनेकजण चांगला पैसा कमावतात, यूट्युबवर प्रसिद्धदेखील होतात. पण, कधीकधी काहीजण यूट्युबर हटके करण्याच्या नादात नकोते करून बसतात, अगदी स्वत:चा जीवही धोक्यात घालतात. याचं ताजं उदाहरण नुकतच पाहायला मिळालं.

ब्रिटनमधला २२ वर्षांचा प्रसिद्ध युट्युबर जे स्विंगलरचा स्टंट करताना जीव जाता जाता वाचला. जेनं आपलं तोंड सिमेंटनं भरलेल्या मायक्रोव्हेवमध्ये घातलं. श्वास घेण्यासाठी त्यानं नाकावर एक नळकांडी बसवली. सिमेंटमध्ये आपण पूर्ण तोंड बुडवलं असलं तरी नळकांडीच्या साह्यानं आपणं आरामात श्वास घेऊ शकतो, असं तो आपल्या चाहत्यांना आत्मविश्वासानं सांगत होता. नवीन एपिसोडसाठी त्यांचं रेकॉर्डिंगही सुरू होतं. पण, काहीकाळानंतर आपण स्टंटच्या नावाखाली किती मोठा मूर्खपणा केला हे लक्षात आल्यावर जेनं आरडाओरड करायला सुरूवात केली. कारणं ओलं सिमेंट सुकून घट्ट व्हायला सुरूवात झाली होती. यात जेचा चेहरा पूर्णपणे अडकला होता. सिमेंट सुकल्यामुळे त्याला आपला चेहरा मायक्रोव्हेवमधून बाहेर काढता येत नव्हता. जेच्या जिवाला धोका आहे हे लक्षात आल्यावर त्याच्या इतर मित्रांनी पोलिसांना बोलावलं. पाचव्या मिनिटांला पोलीस तिथे हजर झाले. चार अग्मिशमन दलाच्या जवानांनी तासभर प्रयत्न करून घट्ट झालेल्या सिमेंटमधून जेचं डोकं बाहेर काढलं आणि जे थोडक्यात वाचला.

नंतर पोलिसांनी ट्विट करत आपली नाराजी व्यक्त केली. जे आणि त्याच्या मित्रानं त्यांच्या स्टंटचा व्हिडिओ यूट्युबवर अपलोड केला असून आतापर्यंत तो वीस लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.