ई-कॉमर्स साईटवरून खरेदी करण्याचं प्रमाण गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. भारतीय ग्राहकांची पसंती या ई- कॉमर्स साईटला मिळताना दिसत आहे. मात्र अशा ठिकाणाहून खरेदी करताना ग्राहकांबरोबर फसवणुकही होत असल्याची असंख्य प्रकरणं समोर आली आहेत. बंगळुरूमधील अमित घार्ग नावाच्या व्यक्तीनं फ्लिपकार्टवरून डिसेंबर महिन्यात २० सोन्याची नाणी मागवली होती. मात्र सोन्याच्या नाण्याऐवजी त्याच्या हाती रिकामा बॉक्स आला.
या फसवणुकीची तक्रार त्यानं ईमेलद्वारे फ्लिपकार्टकडे केली मात्र फ्लिपकार्टकडून समाधानकारक उत्तर न आल्यानं त्यानं जवळच्या पोलिस स्थानकात फ्लिपकार्टविरोधात तक्रार दाखल केली आहे. फ्लिपकार्टनं ग्राहकाला समाधानकारक उत्तर दिलं नाही. त्यामुळे आता आम्ही तक्रार नोंदवून घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती बंगळुरु पोलिसांनी दिली आहे. अमित यांनी काही महिन्यांपूर्वी ६१ हजार रुपये मोजून २० नाणी खरेदी केली होती. ऑर्डरची डिलिव्हरी मिळाल्यानंतर त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरासमोरचं आपलं पार्सल उघडून पाहिलं होतं. मात्र त्यात नाण्यांऐवजी रिकामी खोका होता.
याआधीही फ्लिपकार्टवरून वस्तू मागवल्यानंतर ग्राहकांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. आता ही नाणी कंपनीनं पाठवलीच नाही की ती मधल्या मध्ये गहाळ करण्यात आले याचा तपास पोलीस घेत आहेत.