शस्त्रक्रिया असे नुसते म्हटले तरी व्यक्तीच्या अंगावर येणारा काटा आणि उडणारी गाळण आपल्यातील अनेकांनी अनुभवली असेल. मात्र शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णच गिटार वाजवत असल्याचे तुम्ही कधी ऐकलेय? नाही ना? पण हे प्रत्यक्षात घडले आहे. मेंदूची अतिशय कठिण अशी शस्त्रक्रिया सुरु असताना बंगळुरुमधील एक तरुण गिटार वाजवत होता. रोहन (नाव बदलले आहे) हा ३२ वर्षीय तरुण आपल्या मेंदूच्या शस्त्रक्रियेदरम्यान गिटार वाजवत होता. विशेष म्हणजे त्याच्या या गिटार वाजविण्यामुळे डॉक्टरांनाही शस्त्रक्रिया करणे सोपे गेले.

आता त्याने असे का आणि कसे केले? तर या तरुणाला मेंदूतील मांसपेशींशी निगडीत काही समस्या होती. विशेषतः गिटार वाजवत असताना त्याला हा त्रास अधिक जाणवायचा. त्यामुळे डॉक्टरांनी त्याला गिटार वाजवायला सांगत शस्त्रक्रियेला सुरुवात केली. यामुळे नेमकी समस्या काय आहे हे डॉक्टरांनाही कळणे सोपे झाले आणि त्याची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. तब्बल ७ तास सुरु असलेली ही शस्त्रक्रिया देशातील अशाप्रकारची पहिलीच शस्त्रक्रिया असल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले.

दीडवर्षांपूर्वी गिटार वाजवत असताना त्याच्या डाव्या हाताची तीन बोटे व्यवस्थित काम करत नसल्याचे त्याच्या लक्षात आले. म्युझिशियन डायस्टोनिया या दुर्धर आजाराने हा तरुण आजारी होता. यामध्ये आपोआप स्नायू आकुंचन पावतात. मेंदूकडून स्नायूंना मिळणारा संदेश योग्य पद्धतीने न मिळाल्याने हा आजार होण्याची शक्यता असते. यामध्ये मान, डोळे, आवाज आणि हात अशा अनेक अवयवांवर परिणाम होऊ शकतो. म्युझिशियन्समध्ये या आजाराचे प्रमाण जास्त असते. रोहन गिटार वाजवायला जायचा त्यावेळी त्याची डाव्या हातीची बोटे बरोबर चालत नव्हती. त्यामुळे आपल्याला काही आजार असल्याचे लक्षात आले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.