Man retires at 45 with Rs 4.7 crore savings Know his secrete : श्रीमंत होण्यासाठी एकतर तुमच्याकडे मोठ्या पगाराची नोकरी असली पाहिजे किंवा तुम्हाला शेअर बाजारात ट्रेडिंग करता आलं पाहिजे, अशा चर्चा आपण बऱ्याचदा ऐकतो. पण रेडिटवर करण्यात आलेली एक पोस्ट हे मत बदलू शकते. एका वापरकर्त्याने r/IndianStockMarket या सबरेडिटवर एक स्टोरी पोस्ट केली आहे, ज्यामध्ये वयाच्या ४५व्या वर्षी निवृत्त झालेल्या एका व्यक्तीबद्दल सांगितलं आहे, ज्याची सध्याची बचत ही ४.७ कोटी इतकी आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, या व्यक्तीने कुठलीही गलेलठ्ठ पगाराची नौकरी केली नाही, एखादा उद्योग उभा केला नाही किंवा त्यानी शेअर बाजारात ट्रेडिंग देखील केले नाही. मग त्यांना हे कसं शक्य झालं? याबद्दल त्या व्यक्तीच्या पुतण्याने ही पोस्ट केली आहे.

या पोस्टला ‘तो ४५ व्या वर्षी ४.७ कोटी रुपयांसह निवृत्त झाला’, असे शीर्षक देण्यात आलेली पोस्ट ही या संबंधित व्यक्तीच्या पुतण्याने शेअर केली असून त्याच्या काकांनी हे साध्य होण्याचे श्रेय सातत्य आणि लवकर गुंतवणूक कराण्यास सुरूवात करणे या दोन गोष्टींना दिले आहे. “हे माझे काका होते. त्यांच्याकडे कधीही आकर्षक पगाराची नोकरी नव्हती, त्यांनी कधीही व्यवसाय उभा केला नाही, कधीही शेअर ट्रेडिंग केले नाही. फक्त रटाळ नोकरी केली ज्यातून बऱ्यापैकी पगार मिळत होता.”

फरक पडला तो शिस्तीमुळे. १९९८ साली जेव्हा म्युच्युअल फंड हे त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना पुरेसे माहितीही नव्हते, तेव्हा काकांनी त्या काळासाठी बऱ्यापैकी मोठी असलेली १० हजारांची रक्कम गुंतवण्यास सुरूवात केली, त्यांनी ५०० रुपयांची एसआयपी (सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) सुरू केला, जसे त्यांचे उत्पन्न वाढत गेले तसे त्यांनी ही रक्कम देखील हळूहळू वाढवली. “२०१० पर्यंत ते २०,००० रुपये दर महिन्याला टाकत होते. त्यांनी हे कधीच बंद केले नाही,” असे पोस्टमध्ये म्हटले आहे.

जेव्हा त्यांच्या पुतण्याने हे कसं साध्य झालं असं काकांना विचारलं तेव्हा त्यांनी यावर व्याख्यान दिलं नाही, फक्त एक सीएएमएस स्टेटमेंट आणि त्यांचं बँक पासबूक दाखवलं. त्यामध्ये एकूण रक्कम होती ४.७ कोटी रुपये, असंही पोस्टमध्ये सांगितलं आहे.

पण खऱ्या अर्थाने ते ज्या पद्धतीने जगले हे त्यांना इतरांपासून वेगळे ठरवते. त्यांनी लक्झरी अपार्टमेंट, फॅन्सी कार घेतल्या नाहीत आणि फक्त एकदा फिरायला केरळला गेले. ते ३० वर्ष एकाच २ बीएचके फ्लॅटमध्ये राहिले आणि आयुष्यभर स्कूटर चालवली. फक्त आता निवृत्तीच्या काळात ते ( काका आणि त्यांची पत्नी) सतत, जवळपास दर विकेंडला फिरायला जातात, असेही पोस्टमध्ये सांगण्यात आले आहे.

“मुलांना त्यांच्या एकूण संपत्तीबद्दल काहीही माहिती नाही. जीवनात कोणत्याही व्यावहारिक गोष्टीसाठी मी त्यांच्याकडे जातो. आणि प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर, मला आवश्यक असलेली एकमेव खरी प्रेरणा तेच आहेत,” असे त्या व्यक्तीने पोस्टमध्ये लिहिले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान या पोस्टच्या खाली लोक वेगवेगळ्या कमेट करताना पाहायला मिळत आहेत. अनेकांनी आयुष्यात लवकर गुंतवणूक करणे चांगले असल्याचे म्हटले आहे. तर काही जणांनी आयुष्य रटाळपणे जगल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.