आपल्या आवडत्या सेलिब्रिटींवर छाप सोडण्यासाठी त्यांचे चाहते काय करतील याचा नेम नाही. कोणी सेलिब्रिटींच्या घराबाहेर तासन् तास उभा राहतो. तर कोणी घरभर त्यांचे फोटो लावतो तर कोणी आपल्या लाडक्या अभिनेत्याचं मंदिरही बांधायला मागे पुढे पाहत नाही. असे चाहत्यांचे कितीतरी किस्से आपण पाहिले असतील. काहींनी तर आपल्या आवडत्या अभिनेत्या अभिनेत्रीला भेटण्यासाठी अगदी जीवही धोक्यात घातल्याचं आपण ऐकलं असेल. नुकताच अमेरिकनं ‘पॉप क्वीन’ टेलर स्विफ्टला एका वेडसर चाहत्याचा वाईट अनुभव आलाय.
या गायिकेवर स्वत:ची छाप सोडण्यासाठी २६ वर्षांच्या ब्रुस रॉली या तरूणानं चक्क बँकेत दरोडा घातला. शहरातल्या स्थानिक बँकेच्या शाखेत त्यानं दरोडा घातला. रोकड लुटली आणि ही रक्कम घेऊन तो कारनं टेलरच्या घरी गेला. दोन तास प्रवास करून तो तिथे पोहोचला. त्यानंतर नोटांचे बंडल त्यानं टेलरच्या घरात फेकले. चाहत्याच्या या कृतीनं तिलाही जबरदस्त धक्का बसला. अखेर अँसोनिया पोलीस विभागानं त्याला अटक केली आहे. त्याला कठोर शिक्षा सुनावण्यात आली असून सध्या तो तुरूंगात आहे.
आपल्याला टेलर खूपच आवडते आणि तिच्यावर छाप सोडण्यासाठी मी बँक लुटली असं या गुन्हेगारानं पोलिसांकडे कबुल केलं आहे. दरम्यान चाहत्यानं घेतलेल्या टोकाच्या भूमिकेमुळे टेलरही नाराज आहे. या प्रसंगावर काहीही बोलण्यास तिनं नकार दिला आहे.