अमेरिकेच्या मिसिसिपी राज्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका तरुणाने चक्क विमानतळावरून विमान चोरून आकाशात घिरट्या घातल्या आहेत. तब्बल एक तास हवेत घिरट्या घातल्यानंतर त्यानं वॉलमार्ट स्टोअरमध्ये विमान क्रॅश करण्याची धमकी दिली. अखेर विमानाचं इंधन संपल्यानंतर त्याने एका शेतात विमान उतरवलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी शनिवारी आरोपी वैमानिकाला अटक केली आहे.

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, स्थानिक वेळेनुसार शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास आरोपी वैमानिकानं टुपेलो विमानतळावरून नऊ आसनी विमान चोरलं. यानंतर त्याने एका तासाहून अधिक काळ शहरावर वर्तुळाकार घिरट्या घातल्या. पोलिसांनी त्याच्याशी संपर्क साधला असता त्याने परिसरातील वॉलमार्ट स्टोअरमध्ये विमान क्रॅश करण्याची धमकी दिली. आरोपी तरुण आकाशात घिरट्या घालत असतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.

हेही वाचा- पाकिस्तानी सैन्यांनी स्पीकरवर लावलेल्या गाण्यावर भारतीय जवान थिरकले, पाहा सीमेवरील अनोखा VIDEO

या धक्कादायक प्रकारानंतर पोलिसांनी तातडीने आसपासचा परिसर रिकामा केला. तुपेलो, मिसिसिपी येथील अनेक दुकाने बंद करण्याच्या सूचना दिल्या. तसेच अधिकाऱ्यांनी परिसरातील रहिवाशांना घराबाहेर काढले आणि शक्य तितक्या लोकांना पांगवण्याचा प्रयत्न केला.

आरोपी वैमानिक कोण आहे?
आरोपी वैमानिक हा टुपेलो प्रादेशिक विमानतळाचा कर्मचारी आहे. त्याने आज पहाटे पाचच्या सुमारास टुपेलो विमानतळावरील ‘१९८७ बीच सी९०ए’ हे दोन इंजिन असलेलं नऊ आसनी विमान चोरलं होतं. टुपेलो पोलीस विभागाने सांगितले की ते वैमानिकाशी संपर्क साधू शकत होते, त्याने जाणूनबुजून वॉलमार्ट स्टोअरवर विमान क्रॅश करण्याची धमकी दिली. या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे, घटनेचा पुढील तपास केला जात आहे. त्याने हा धक्कादायक प्रकार नेमका कोणत्या कारणातून केला, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही.