Sachin Tendulkar Neighbor Complaints: मुंबईमध्ये ठिकठिकाणी चालू असणारी बांधकामं आणि त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मोठमोठ्या मशीनचे कर्णकर्कश्श आवाज हे आता खरंतर मुंबईकरांच्या सवयीचे झाले आहेत. यापूर्वी सामान्य माणसांनीच नव्हे तर सेलिब्रिटी मंडळींनी सुद्धा या आवाजाच्या तक्रारी केल्या आहेत. पण आता हा आवाज सेलिब्रिटीच्या घराबाहेरच होत असल्याची तक्रार एका व्यक्तीने केली आहे. दिलीप डिसुझा नामक एका व्यक्तीची X अकाउंटवरील पोस्ट मागील दोन दिवसांपासून चर्चेत आहे. दिलीप हे स्वतः सचिन तेंडुलकरचे शेजारी आहेत आणि त्यांनी आपल्या पोस्टमधून सचिनचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे. सचिनच्या घराबाहेर चालू असलेल्या कामामुळे होणाऱ्या आवाजाविषयी दिलीप यांनी तक्रार वजा विनंती केली आहे.

५ मे ला दिलीप यांनी सचिन तेंडुलकरला टॅग करून पोस्ट लिहिली. ज्यात म्हटले की, “प्रिय @sachin_rt, रात्रीचे जवळपास ९ वाजले आहेत आणि दिवसभर तुमच्या वांद्र्याच्या घराबाहेर मोठा आवाज करणारा सिमेंट मिक्सर अजूनही तसाच आहे, अजूनही खूप आवाज येत आहे. कृपया तुम्ही तुमच्या घरी काम करणाऱ्या लोकांना योग्य ‘कामाची वेळ’ पाळण्यास सांगू शकाल का? खूप खूप धन्यवाद”.

सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांची तक्रार

दिलीप यांची प्राथमिक पोस्ट तुफान व्हायरल झाल्यानंतर त्यांना साधारण ६ लाखाहून अधिक लोकांनी प्रतिक्रिया दिली होती. नंतर याच तक्रारीबद्दल अपडेट शेअर करताना, दिलीप यांनी सांगितले की,” तक्रारीनंतर तेंडुलकरच्या कार्यालयातून त्यांना अतिशय प्रेमाने कुणीतरी कॉल केला होता. त्यांनी त्यांच्या अडचणी आणि आवाज कमी करण्यासाठी ते करत असलेले प्रयत्न सांगितले , तसेच मला होणारा त्रास सुद्धा त्यांनी नीट ऐकून घेतला. इथे मोठमोठ्याने आवाज करणाऱ्या इतरांच्या तुलनेत त्यांनी अत्यंत उत्तम प्रतिसाद दिला.”

सचिन तेंडुलकरच्या वतीने दिलेलं उत्तर

हे ही वाचा<< “रोहित शर्मा पुढचं IPL मुंबईकडून खेळणार नाही, त्याऐवजी..”, म्हणत वसीम अक्रमने वर्तवलं हिटमॅनचं भविष्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या व्हायरल तक्रारीच्या पोस्टवर अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या कमेंट्स केल्या आहेत. काहींनी लिहिलं की, “तुम्हाला एवढा त्रास होत होता तर तुम्हीच आधी थेट त्यांच्या ऑफिसमध्ये कॉल करून विचारपूस करायला हवी होती, पण नाही तुम्हाला ऑनलाईन प्रकरण वाढवून प्रसिद्धी हवी होती.” तर एकाने विचारले की, “आम्ही असं ऐकलंय की सचिनने तुमची माफी मागण्यासाठी व तुम्हाला समजवण्यासाठी स्वतः पत्र लिहिले आहे, हे खरं आहे का?” याशिवाय इतर अनेकांनी दिलीप यांच्या धाडसाचे तसेच सभ्यपणे लिहिलेल्या पोस्टचे कौतुकही केले. “आपला मुद्दा मांडणे हे खूप गरजेचे असते, मग समोर कुणीही असो, “तक्रार करताना अशी नम्रता बाळगणेही तितकेच आवश्यक आहे.”अशाही कमेंट्स दिलीप यांच्या पोस्टवर आहेत.