घरी एखादे नातेवाईक आल्यानंतर काय मग लग्न कधी करतोयस? अशा प्रश्नाला तुम्हाला अनेकदा सामोरं जावं लागलं असेल. अनेक वेळा तुम्ही काहीतरी कारण सांगून तेथून निघाला असाल…नाही तर नोकरी, पगार वैगेरे सगळं काही व्यवस्थित होत नाही तोवर लग्न करणार नाही असं सांगत वेळ मारली असेल. आता हेच पहा ना…Mi मोबाइलचा चाहता असणाऱ्या तरुणाने तर थेट जोपर्यंत आपल्या हातात Mi 10T Pro येत नाही तोपर्यंत लग्नच करणार नाही अशी शपथ घेतली. विशेष म्हणजे शाओमीने त्याला शपथ पूर्ण करण्यात मदत केली आणि एक नवीन मोबाइल दिला.

आता या तरुणाला खरंच फोन हवा होता की लग्न टाळण्यासाठी ही शपथ घेतली हे त्यालाच ठाऊक…तर झालं असं की, कमल अहदम या तरुणाने ११ डिसेंबरला ट्विट करत, “जोपर्यंत आपल्याला Mi 10T Pro (sic) मिळत नाही तोवर लग्न करणार नाही”, अशी शपथ घेतली.

२१ डिसेंबरला त्याला मोबाइल मिळाल्यानंतर ट्विट करत त्याने कंपनीचे आभार मानले.

पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की शाओमीने कमल अहमदला असाच फुकट कसा काय मोबाइल दिला ?..तर तसं नाही आहे. शाओमीच्या प्रवक्त्याने इंडिया टुडेशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, कमल अहमद कंपनीच्या अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होत होता. नशीबाने तो कुपन जिंकला आणि मोबाइल मिळाला.

शाओमीचे भारतातील प्रमुख मनू कुमार जैन यांनीदेखील कमल अहमदचं अभिनंदन केलं आहे. आता तू लग्नासाठी तयार असशील असी कोपरखळीही त्यांनी मारली आहे.