प्रेम आणि काळजी असलेल्या नात्यात महत्त्वाकांक्षा आणि आर्थिक योगदान या गोष्टी तणाव निर्माण करू शकतात. लग्न झालेल्या जोडप्यांमध्ये अनेकदा असं दिसून येतं की, एकजण पूर्णपणे आर्थिक जबाबदारी घेतो आणि एक जण पूर्णपणे कुटुंब सांभाळण्याची. याउलट बहुतांश नवरा-बायको दोघेही काम करतात आणि संसाराचा भार सारखाच पेलतात. पण जेव्हा हे संतुलन बिघडतं तेव्हा मात्र त्याचा गंभीर परिणाम नात्यांवर होतो. गुडगावमधल्या एका सॉफ्टवेअर इंजिनियरने नुकताच त्याचा अनुभव शेअर केला आहे. एकमेव व्यक्ती कमावती असल्यास त्याला काय संघर्ष करावा लागतो अशा आशयाची पोस्ट या व्यक्तीने एका पेजवर शेअर केल्याचे वृत्त न्यूज १८ने दिले आहे.

काय म्हणाला हा इंजिनियर?

वार्षिक उत्पन्न २६ लाख रूपये आणि बचत फक्त १५ हजार रूपये. “मला सतत धाकधूक वाटते. एवढा पगार असूनही मी फक्त १५ हजारच वाचवू शकत आहे”, असे या व्यक्तीने त्याच्या एका इंस्टाग्रामवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

योगदान देणारी आणि महत्त्वाकांक्षी पत्नी हवी

३४ वर्षीय हा तरूण सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करतो आणि त्याच्या पत्नी आणि मुलीसह राहतो. त्याने त्याचा मासिक खर्च सोशल मीडियावर शेअर केला आहे. भाड्याचे ४० हजार रूपये, किराणा सामान आणि इतर बिलांचे ३० हजार रूपये, कारच्या ईएमआयचे १६ हजार रूपये, पालकांना पाठवायचे २० हजार रूपये आणि मुलीच्या शाळेसाठी तसंच तिच्या इतर गरजांसाठी ५० हजार रूपये असं वर्गीकरण त्याने या पोस्टमध्ये केलं आहे.

या व्यक्तीच्या ३० वर्षीय पत्नीने एमबीए अर्धवट सोडले आणि सात वर्षांपूर्वी लग्न झाल्यापासून तिने काहीच काम केलेले नाही. यावर त्याने म्हटले की, “आधी मला वाटत होतं की ठीक आहे ती कालांतराने काहीतरी काम करेल. कदाचित घरून काहीतरी काम करेल. मात्र आता मुलगी होऊन सहा वर्षे झाल्यानंतरही तिच्या काहीच महत्त्वाकांक्षा नाहीत. कधीकधी असं वाटतं करिअर आणि सर्वच बाबतीत महत्त्वाकांक्षी व्यक्तीशी लग्न केलं असतं तर बरं झालं असतं.”

नेटकऱ्यांनी दिला सल्ला

काही नेटकऱ्यांनी असंही सुचवलं आहे की, “तुम्ही घरकामात हातभार लावता का आणि तुमच्या मुलीची काळजी घेता का? जर तुम्ही हे काम करत असाल तरच तिला काम करायला सांगा.”
दुसऱ्या एकाने लिहिले की, “घराचं भाडं ४० हजार आणि मुलीचा खर्च ५० हजार… तुम्ही गरीब नाही आहात, फक्त तुमच्याकडे पैशाच्या व्यवस्थापनाचा अभाव आहे.”
नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया देताना पालक म्हणून दोघांच्याही आव्हानांवर प्रकाश टाकला.

नवरा-बायको हे नातं जपताना खरं तर दोन्ही बाजूंचा समतोल सारखा असला पाहिजे. ऑफिसचं काम आणि घरातल्या जबाबदाऱ्या या दोघांनीही नेटाने पार पाडायल्या हव्यात. शिवाय एकमेकांची साथ असेल तर पुढे भविष्यात मुलं झाल्यावरही या गोष्टी जड जात नाहीत. मात्र, यावरून एक गोष्टदेखील अधोरेखित होते ती म्हणजे महिलांची महत्त्वाकांक्षा असणं याला कितपत प्राधान्य दिलं जातं. एखादी महिला असेलही महत्त्वाकांक्षी पण तिला घर, मुल आणि नोकरी अशी तारेवरची कसरत ही करावीच लागते.