आपल्या हरवलेल्या पत्नीचा शोध घेण्यासाठी सायकलवर तिचे फोटो लावून गल्लोगल्ली फिरणा-या नव-याला अखेर यश आले आहे. नऊ महिन्यांनी त्याच्या पत्नीचा शोध लागला असून सोशल मीडियावर त्यांची गोष्ट पुन्हा एकदा व्हायरल झाली आहे. मूळचे उत्तर प्रदेशमधल्या मेरठ येथे राहणा-या तपेश्वर सिंह यांची पत्नी गेल्या नऊ महिन्यांपासून बेपत्ता होती. दिवस रात्र एक करून त्यांनी सारे उत्तर प्रदेश पालथे घातले. सायकलच्या पुढच्या आणि मागच्या बाजूला त्यांनी मोठा सूचना फलक लावून त्यावर आपल्या पत्नीचा फोटो आणि तिची माहिती छापली होती. त्यावेळी इंटरनेटवर पत्नीचा शोध घेणा-या तपेश्वर यांचे फोटो व्हायरल झाले होते. अनेकांची त्यांचे फोटो शेअर करत त्यांच्या पत्नीला शोधण्याचे आवाहन देखील केले होते. अखेर उत्तराखंड येथील हल्दवानी येथे त्यांची पत्नी सापडली अशी माहिती ‘द टाईम्स ऑफ इंडिया’ने दिली आहे.
तपेश्वर आणि त्यांची पत्नी बबिता यांचा प्रेमविवाह तीन वर्षांपूर्वी झाला होता. कामानिमित्त तपेश्वर मेरठमध्ये आले होते. पण एके दिवशी त्यांची पत्नी अचानक गायब झाली. तिचे मानसिक संतुलन बिघडले आहे अशी माहितीही कुटुंबियांनी दिली. मार्च महिन्यापासून त्यांची पत्नी बेपत्ता आहे. बबिताची चौकशी करत असताना तिला एका दलालाने जबरदस्ती वेश्याव्यवसायात ढकलले असल्याचे त्यांना समजले. अनेक रेड लाईट एरियात देखील तपेश्वर यांनी आपल्या पत्नीचा शोध घेतला. पोलिसांच्या मदतीने तपेश्वर यांनी या दलालाला शोधून काढले. अखेर तपेश्वर यांना उत्तराखंडमधल्या हल्दवानी येथे आपली पत्नी भिक मागताना सापडली. तपेश्वर यांनी तिला सुखरूप घरी आणले. तिला शोधण्यासाठी त्यांनी १० वर्षे मेहनत करून कमावलेली पैन् पै पणाला लावली होती.