गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही नक्कीच धडकी भरेल. या व्हिडीओमध्ये एक १०३ वर्षीय व्यक्ती विमानातून पॅरशूट जंप करताना दिसत आहे. ब्रिटनमध्ये राहणाऱ्या अल्फ्रेड अल बलास्के यांनी हा पराक्रम केला आहे. सर्वात वयस्कर व्यक्तीने मारलेली टॅन्डम पॅरशूट जंम्प म्हणून अल्फ्रेड यांच्या या कारनाम्याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. असा पराक्रम करणारे अल्फ्रेड हे पहिलेच व्यक्ती ठरले आहेत. अल्फ्रेड यांची ही विक्रमी उडी पाहण्यासाठी त्यांचे पूर्ण कुटुंब, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आणि त्यांच्या परिचयाचे लोक उपस्थित होते.

अल्फ्रेड यांनी प्रती तास १२० मैल वेगाने १४ हजार फुटांवरुन उडी मारली. यावेळी त्यांच्यासोबत एक इन्स्ट्रक्टरही होता. अमेरिकेतील टेक्सास राज्यातील सॅन मार्कोनच्या आकाशामधून त्यांनी ही उडी मारली. विमानातून उडी मारल्यानंतर जमीनीवर पोहचण्यासाठी अल्फ्रेड यांना पाच मिनिटांचा कालावधी लागला. यापूर्वी वयाच्या १०० व्या वर्षी म्हणजे २०१७ मध्ये अल्फ्रेड यांनी स्काय डायव्हिंग केलं होतं. आपण पुन्हा एकदा अशाप्रकारची उडी नक्की मारु असा विश्वास त्यावेळी त्यांनी व्यक्त केला होता. दिलेल्या शब्दानुसार आता अल्फ्रेड यांनी वयाच्या १०३ व्या वर्षी तोच कारनामा पुन्हा केला आहे. यावेळी त्यांच्या या उडीची दखल गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने घेतली आहे.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स अकाऊंटवरुन अल्फ्रेड यांनी मारलेल्या उडीचा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. “१०३ वर्षाच्या या वयस्कर व्यक्तीने नातवाचे ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर आपण स्कायजंप करु असं म्हटलं होतं,” अशी कॅप्शन व्हिडिओला देण्यात आली आहे. या ट्विटमध्ये गिनीजने आश्चर्यचकित झाल्याचे दर्शवणाऱ्या इमोन्जीही वापरला आहे. तीन ऑक्टोबर रोजी हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. अनेकांनी अल्फ्रेड यांचे कौतुक केलं आहे. तर बऱ्याच जणांनी या वयामध्ये अल्फ्रेड यांनी दाखवलेली हिंमत कौतुकास्पद असल्याचे म्हटले आहे.

खरोखरच या आजोबांच्या हिंमतीची दाद द्यायला हवी असेच म्हणावे लागेल.