भारतीय क्रिकेटर मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहाँ गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या वैवाहिक जीवनात सुरू असलेल्या वादामुळे चर्चेत राहिले आहे. शमीचे अनेक महिलांसोबत विवाहबाह्य संबंध सुरू असल्याचा आरोप करत तिनं महिलांसोबतच्या चॅटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. यामुळे चांगलीच खळबळ उडाली होती. मात्र आता या गोष्टी मागे सोडत हसीन पुन्हा मॉडेलिंग क्षेत्राकडे वळली आहे.
हसीननं नुकताच तिच्या ट्विटर अकाऊंटवरून फोटोशूटचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. शमीशी लग्न होण्याआधी हसीन मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत होती. शमीनं लग्नानंतर आपल्याला करिअर सोडण्यास भाग पाडलं असाही आरोप हसीननं केला आहे. मात्र आता बोल्ड फोटोशूटचा व्हिडिओ शेअर करून तिनं नव्या इनिंगला सुरूवात केल्याचं दिसून येत आहे.
https://twitter.com/HasinJahan4/status/1015637674990841858
मोहम्मद शमी त्याच्या भावाच्या मेव्हणीसोबत लग्न करणार असल्याचा आरोप हसीननं महिन्याभरापूर्वीच केला होता. तिच्या या आरोपावर शमीनं उपरोधिक उत्तर दिलं होतं. ‘मी माझ्या पहिल्या लग्नामुळेच इतका त्रस्त आहे, त्यात दुसरे लग्न करायला मी तुम्हाला वेडा वाटतो का ? मागच्या काही महिन्यात हसीनने माझ्यावर भरपूर आरोप केले आहेत. त्यात आता हा एक नवीन आरोप आहे. मी दुसरे लग्न करणार असल्यास त्या लग्नाला उपस्थित राहायला मी हसीनला निमंत्रण देईन’ असा टोला लगावत त्यानं हसीनचे आरोप फेटाळून लावले होते. हसीननं काही महिन्यांपूर्वी मोहम्मद शमीवर मारहाण, हत्येचा प्रयत्न, घरगुती हिंसाचार आणि मॅच फिक्सिंगसारखे अत्यंत गंभीर आरोप केले होते.