रुग्णवाहिका उपलब्ध नाही म्हणून आपल्या पत्नीचे शव खांद्यावरून १२ किलोमीटरपर्यंत वाहून नेण्याची वेळ दाना मांजीवर आली होती. या प्रकरणानंतर अशा कितीतरी घटना समोर आल्या , जिथे रुग्णवाहिका नसल्याने नातेवाईकांना रुग्णांचे मृतदेह खांद्यावरून किंवा सायकलवरून वाहून नेण्याची वेळ आली. अनेक गावात तर अजूनही रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने रुग्णांचे प्राण गेल्याच्या घटना घडल्या आहेत.
मात्र एका तरुणाने अनोखी शक्कल लढवत या समस्येवर उपाय शोधून काढला आहे. वाईट परिस्थितीत रुग्णांची अडचण होऊ नये म्हणून त्याने चक्क दुचाकीची रुग्णवाहिका बनवली आहे. या तरुणाचे नाव आहे मोहम्मद खान. अंपगांसाठी मोहम्मद दुचाकी तयार करतात. त्यांच्यासाठी खास रचना असलेल्या बाईक किंवा गाडी मोहम्मद डिझाइन करतात. हेच बनवत असताना त्यांना एकदा बाईक रुग्णवाहिकेची कल्पना सुचली. त्याने ही कल्पना प्रत्यक्षात देखील उतरवली. एका दुचाकीचे रुपांतर त्याने रुग्णवाहिकेत केले.
ही रुग्णवाहिका अत्याधुनिक यंत्रणांनी सज्ज असून याच्या एका बाजूला रुग्णांना ठेवण्यासाठी बेड बसवण्यात आला आहे, तर ऑक्सिजन सिलेंडर लावण्याचीही सोय यात करण्यात आलीय. छोटा पंखा, फर्स्ट एड बॉक्सही येथे ठेवण्यात आला आहे. दुर्गम भागातील गरीबांसाठी या रुग्णवाहिका वापरता येणार आहे. जर सरकारची मान्यता मिळाली तर अशा जास्तीत जास्त रुग्णवाहिका तयार करण्याचा त्याचा मानस आहे.