मध्य प्रदेशमधील राजगड जिल्ह्यामध्ये एका माकडाच्या अंत्यसंस्काराला गावामधील तब्बल पाच हजार जण जमल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. या माकडाच्या निधनानंतर पारंपारिक पद्धतीने माकडावर अंत्यसंस्कार करण्यात आले. डालूपुरा गावामधील लोकांनी तीन दिवसांनंतर या माकडाच्या अस्थी उज्जैनला जाऊन शिप्रा नदीमध्ये विसर्जित केल्यात. या माकडाच्या तेराव्याची आमंत्रण पत्रिका छापण्यात आलीय. या माकडाच्या तेराव्यासाठी १२ गावांमधून वर्गणी गोळा केली जातेय.
९ जानेवारी रोजी गावामधील एका व्यक्तीने मुंडन करुन माकडाच्या दहाव्याचे विधी केले. मागकडाच्या तेराव्याच्या कार्यक्रम सोमवारी पार पडला. यावेळेस तेराव्याच्या जेवणासाठी जवळजवळ पाच हजार लोकांनी जेवण केलं. गावातील लोकांनी न्यूज १८ ला दिलेल्या माहितीनुसार माकड हे हनुमानाचं रुप आहे. त्यामुळेच माकडाच्या निधनानंतर गावकऱ्यांनी एकत्र येत अगदी अंत्यसंस्कारापासून ते तेराव्यापर्यंतचे सगळे विधी केले.
राजगडमधील खिलचीपूर जिल्ह्यामधील डालूपुरा गावामध्ये सोमवारी माकडाच्या तेराव्यानिमित्त भोजन समारंभ आयोजित करण्यात आलेलं. गावातील सरकारी शाळेच्या पटांगणामध्ये लांबच लांब पंगती बसवून हा कार्यक्रम पार पडला. यामध्ये जवळजवळ २४ गावांमधील ५ हजार लोकांनी जेवणाचा लाभ घेतला. डालूपुराबरोबरच आजूबाजूच्या गावांनीही या कार्यक्रमासाठी निधी दिला होता. एक हजार किलो पीठ, ३५० लीटर तेल, अडीच हजार किलो साखर. १०० किलो बेसनापासून महाप्रसाद बनवण्यात आलेला. जेवणामध्ये बुंदी, तिखट शेव, पुरी आणि कढी बनवण्यात आलेली.
खिलचीपूरमधील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार २९ डिसेंबर रोजी गावामध्ये एका माकडाचा मृत्यू झाला. सकाळी हे माकड जंगलामधून गावात आलं होतं. त्याच रात्री थंडीमुळे कुडकुडू लागलं. गावकऱ्यांनी या माकडावर उबदार कपडे टाकले. मात्र माकडाची प्रकृती खालावत गेली. त्यामुळे माकडाला खिचलीपूरमधील पशु चिकित्सा केंद्रात नेण्यात आलं. काही औषधं घेऊन गावकरी माकडासहीत गावात परतले. मात्र रात्री माकडाचा मृत्यू झाला. सकाळी माकडावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. रात्रभर गावातील अनेक लोक माकडाच्या पार्थिवाजवळ भजन गात होती.
सकाळी सर्व गावकरी गावातील हनुमान मंदिराजवळ जमा झाले. त्यांनी माकडाच्या पार्थिवासाठी तिरडी बांधली. ही तिरडी फुलांनी जसवण्यात आली. बॅण्डबाजासहीत वाजत गाजत या माकडाची अंत्ययात्रा काढण्यात आली. बॅण्डवाले भजनांच्या धून वाजवत होते. यामध्ये महिलांचाही समावेश होता. या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झालेली गावातील पुरुष मंडळी ‘राम नाम सत्य है’ म्हणत चालले होते.